लोकनेता न्यूज नेटवर्क
फुलगाव (गौतम पाटोळे) :- लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी प्रदीपदादा कंद युवा मंच व पै. किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित काशी विश्वनाथ व अयोध्या देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी गोल्डन पॅलेस, पेरणे टोलनाक्याजवळ भव्य संवाद मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याला परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. भाविकांच्या चेहऱ्यावर आगामी यात्रेबद्दल आनंद व समाधानाचे भाव दिसत होते. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत काशी-अयोध्या दर्शनासारखा पुण्यप्रवास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देणं हे खरोखरच अभिमानास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन केले.
या यात्रेचा पहिला टप्पा बुधवार, दि. ५ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा १३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारंभ होणार आहे. यात्रेच्या आयोजनासाठी प्रवाशांच्या नोंदणीपासून निवास, भोजन, मार्गदर्शन, सुरक्षा आदी सर्व व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पैलवान किरण संपत साकोरे यांच्या पुढाकारातून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या यात्रेद्वारे नागरिकांना काशी विश्वनाथ, अयोध्या श्रीराम मंदिर तसेच इतर पवित्र स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
मेळाव्यादरम्यान यात्रेची रूपरेषा, प्रस्थानाची तारीख, मार्ग, निवास व्यवस्था आदींचे सविस्तर मार्गदर्शन आयोजकांच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रदीपदादा कंद यांनी यात्रेसाठी प्रस्थान करणाऱ्या भाविकांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आणि धर्म, संस्कृती आणि समाज एकत्र येऊनच खरी यात्रा यशस्वी होते असे सांगत उपस्थित नागरिकांचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्साहवर्धक पद्धतीने करण्यात आले तर शेवटी देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये एकात्मतेचा भाव निर्माण केला. संवाद मेळाव्याने या पुण्ययात्रेच्या यशस्वी प्रारंभाची पूर्वसूचना दिली.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली वाळके, अनिल चोंधे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आजी माजी पदाधिकारी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment