निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा डाव, राज्यात भाकरी फिरण्याची दाट शक्यता


लोकनेता न्युज नेटवर्क

परभणी (दत्तात्रय कराळे) :- राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच याबाबत महत्वपूर्ण अशी माहिती समोर आणली आहे.

          राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वार जोरदार वाहू लागलं आहे. प्रचाराला देखील मोठी रंगत आली असून सर्वत्र आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर राज्यात लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची देखील शक्यता दिसून येत आहे. दरम्यान, लवकरच महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो. या सर्व निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुंदोपसुंदी पुढे येत आहे. त्याचाच परिपाक म्हणून राज्यात अनेक ठिकाणी ही निवडणूक स्वबळावर लढवण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व निवडणुकांपूर्वी भाजपनं आता मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात भाजप आता भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

         महाराष्ट्राच्या युवा शक्तीवर विश्वास दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये आयोजित एका महाराष्ट्राच्या युवा शक्तीवर विश्वास दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही जास्तीत जास्त तरुणांना संधी देणार आहोत. आमचा पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी ४० टक्के जागा या ३५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांना देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपच्या या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महानगरपालिकेपासून सर्वच निवडणुकांचा समावेश असणार आहे.

         दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील असाच निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या सर्व नेत्यांना सूचना केली होती की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्तीत-जास्त तरुणांना संधी द्या. दरम्यान, त्यानंतर आता भाजपकडून देखील असाच निर्णय घेण्यात आला आहे, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी तशी माहिती दिली आहे. भाजपकडून आता तरुणांना जास्तीत जास्त संधी या निवडणुकीमध्ये दिली जाणार आहे.

ठाकूरांचंही सकारात्मक निर्णयावर लक्ष

        बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचाही त्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचा कल दिसून येत आहे. अधिकाधिक तरुणाईला सामाजिक व राजकीय कार्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असेच दिसतेय. प्रथम फळीतील काही नेत्यांवर नवोदित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तर अधिकांश नेत्यांवर संघटनात्मक बांधणीची जबाबदारी सोपवून त्यांना वसई-विरार उपप्रदेशाच्या बाहेर पडत राज्यात पक्ष अन्यत्र नेण्यासाठीची मोठी प्रणाली राबविली जाईल असे चित्र दिसून आल्यास नवल वाटू नये. आयुष्याची शतकमहोत्सवी राजकीय वाटचाल करणारे शरद पवार हे सुध्दा आपल्या वयाचा कोणताही विचार न करता पक्षाला संजीवनी देण्याची व तरुणाईला अग्रेसर बनविण्याची त्यांची जी धडपड सुरु आहे, ती निश्चितच तरुणाईलाही लाजवणारी ठरु शकेल. तथापि ठाकूरांनी सुध्दा तशी झेप घेतली तर त्यात नवल ते कसले ? खरं तर त्यांनी वसई-विरारच्या बाहेर पडण्याचा हा निर्णय पाच दहा वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता. परंतु उशिरा का होईना, जो काही निर्णय ते घेतील तो निश्चितच चांगला राहील, यात कोणतीही साशंकता नसावी.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments