निवडणूक प्रक्रियेला सुरुवात


लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- सिंदखेड राजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे बिगुल वाजले असून मा. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. 

मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नाम निर्देशन पत्र स्वीकारणे व त्या अनुषंगिक कामकाजाबाबत आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता नगरपरिषद कार्यालय सिंदखेडराजा येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

सदर सभेमध्ये मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत,

* प्राप्त नाम निर्देशन पत्रांची तपासणी नियमानुसार आणि तपासणी सूची नुसार करण्यात यावी.

* नामनिर्देशनाबाबत विहित मुदतीत ऑनलाईन प्रक्रिया पार पाडावी, अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने अर्ज व्यवस्थित तपासून घेण्यात यावा.

* उमेदवारांची अनामत रक्कम जमा करून घेणे व लेखा अद्यावत करणे बाबत विशेष सूचना देण्यात आल्या.

* मा. निवडणूक आयोगाला सादर करावयाची माहिती तात्काळ सादर करावी.

* अर्जाबाबत दैनंदिन अहवाल सादर करावा.

* उमेदवारांना मा. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना अवगत करून द्याव्यात.

* नामनिर्देशन अर्ज बाबतची दैनंदिन स्थिती सूचना फलकावर प्रसिद्ध करावी.

* आरक्षणाची अधिसूचनेनुसार कार्यवाही करावी.

* मा.निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हांच्या यादीनुसार कार्यवाही करावी.

* मा. निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीनुसारच नामनिर्देशनाची प्रक्रिया पार पाडावी.

* उमेदवारांचे वय हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत 21 वर्षे पूर्ण असायलाच हवे हे तपासून घ्यावे.

* प्रत्येक प्रभागांमध्ये दोन मतदान केंद्र आहेत व एका प्रभागांमध्ये तीन मतदान केंद्र आहेत.

* उमेदवाराने कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरला आहे याची खात्री करावी.

* जर एखाद्या उमेदवारांनी आरक्षणातून अर्ज सादर केला असेल तर जात वैधता प्रमाणपत्र तपासणी आवश्यक आहे.

* उमेदवारांकडून चिन्हाबाबत घोषणापत्र लिहून घ्यावे.

* मान्यताप्राप्त पक्षांना त्यांचे निवडणूक चिन्ह देण्यात यावे.

* A/B फॉर्म बाबत नस्ती ठेवावी, A फॉर्म घेताना RO किंवा ARO ची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.

* अर्जासोबत शपथपत्राची नोटरी केली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

अशाप्रकारच्या सूचना मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडून देण्यात आल्या. सदर सभेसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे, नायब तहसीलदार डॉक्टर प्रवीण कुमार वराडे तसेच सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दि.10/11/2025 पासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त करून घ्यायला सुरुवात झाली आहे,आज पासून नामनिर्देशन पत्र नगर परिषद कार्यालयात विक्री साठी उपलब्ध करण्यात आले आहेत. 

निवडणूक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र हे मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नगर परिषद कार्यालय येथील दालनामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकृती सुरु आहे , आज दि. 10/11/2025 पर्यंत सिंदखेडराजा नगर परिषद सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नाही. 

आज एकूण 24 व्यक्तींनी एकूण 38 नामांकन नामनिर्देशन पत्र घेतले असून, एकूण 40 लोकांनी मतदान याद्या घेतल्या आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments