लोकनेता न्यूज नेटवर्क
नळगीर (प्रकाश केंद्रे) :- उदगीर तालुक्यातील, देऊळवाडी ते गुंडोपंत-दापका या रस्त्याचे बांधकाम अवघ्या चार महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. पण या रस्त्याचे काम इतके दर्जाहीन झाले की, काही महिन्यांतच संपूर्ण रस्ता उखडून गेला. खड्डे तयार झाले, डांबर निघून गेले आणि रस्त्याचे अस्तित्वच संपले.
गावकऱ्यांनी सांगितले की, “या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले. पण काम सुरू झाल्यापासूनच आम्ही पाहत होतो की, साहित्य निकृष्ट दर्जाचं वापरलं जात आहे. तरीही कोणीही लक्ष दिलं नाही.”
तक्रारींची दखल नाही!
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) येथे लेखी तक्रारी दिल्या. मात्र, आजवर कोणतीही चौकशी झालेली नाही. उलट अधिकाऱ्यांनी केवळ टाळाटाळ केली, अशी ग्रामस्थांची खंत आहे.
“रस्ता उखडून गेला, पण अधिकारी एकदाही पाहणीला आले नाहीत. हे दुर्लक्ष जनतेचा अपमान आहे,” असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांचा कायदेशीर लढा सुरू
संतप्त ग्रामस्थांनी आता ठरवलं आहे की, ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि जबाबदार यंत्रणेविरुद्ध कायदेशीर कारवाई करायची. त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अर्जात नमूद केलं आहे की, “दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अर्जावर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्यात यावी.”
प्रशासनाचे मौन संशयास्पद!
चार महिन्यांत उखडलेला रस्ता, तक्रारी असूनही चौकशी नाही, अधिकारी गप्प. या सगळ्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे.
जनतेच्या पैशांचा असा वापर कोणाच्या आशीर्वादाने होत आहे?
गावकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देणारा अधिकारी आजवर पुढे आला नाही.
जर जनतेच्या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्षच करायचे असेल, तर ग्रामीण भागात विकासाच्या नावाखाली सुरू असलेली ही कामे नेमकी कोणासाठी जनतेसाठी की ठेकेदारांसाठी?
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment