हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रे शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी? डॉ.गणेश ढवळे हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी सुरू; पण बहुतांश शेतकरी आधीच विक्री करून बसले


लोकनेता न्युज नेटवर्क

बिड (पांडुरंग हराळे) :- लिंबागणेश (दि. ७): महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर २०२४-२५ हंगामासाठी हमीभाव खरेदी योजना सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

राज्यातील सोयाबीन, उडीद आणि मुग या प्रमुख पिकांच्या हमीभाव खरेदीसाठी शासनाने ३० ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी केंद्रांवर प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र जिल्ह्यातील वास्तव वेगळेच आहे — कारण अतिवृष्टी आणि आर्थिक अडचणींमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल आधीच खाजगी व्यापाऱ्यांना विकून टाकला आहे.

🌧️ अतिवृष्टीचा फटका आणि विक्रीची घाई

अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्हीवर परिणाम झाला. त्यातच बियाणे, खत, कीटकनाशक या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले. परिणामी, मिळेल त्या भावात — ₹३५०० ते ₹४१०० प्रति क्विंटल दराने — अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन खाजगी व्यापाऱ्यांकडे विकले.

शासनाची खरेदी अजून सुरूच झालेली नसल्याने, शेतकरी म्हणतात की – “पोटाची भूक थांबत नाही; खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाली असती, तर फायदा झाला असता.”

🕒 खरेदी केंद्र उशिरा – व्यापाऱ्यांना फायदा? : डॉ. गणेश ढवळे

शासनाने बीड जिल्ह्यात २३ खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत. मात्र खरेदी उशिरा सुरू होत असल्याने बाजारात व्यापाऱ्यांनी आधीच कमी भावाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करून साठवणीस सुरुवात केली आहे.

त्यामुळे शासनाने ठरवलेली केंद्रे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहेत की साठवणूक केलेल्या भांडवलदार व्यापाऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेश) यांनी उपस्थित केला आहे.

📄 शेतकऱ्यांसाठी अटींचा पेच

हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करताना शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, पीक पेरा नोंद, केवायसी इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात.

अनेक शेतकऱ्यांना इंटरनेट सुविधा व तांत्रिक मदत नसल्याने नोंदणी करणे अवघड ठरत आहे.

“योजना चांगली आहे, पण वेळेवर अंमलबजावणी आणि साधनांची सोय नसेल, तर ती शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचणार?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे.

मात्र प्रत्यक्षात प्रश्न कायम — ही योजना शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी?

कारण हमीभाव केंद्रे उघडण्यापूर्वीच बाजारात माल विकला गेला, आणि उर्वरित शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी करू शकलेले नाहीत. परिणामी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याबाबत लिंबागणेश येथील शेतकरी मोहन कोटुळे, अंकुश जाधव, रामचंद्र मुळे, प्रमोद निर्मळ, अनंत आमटे, अशोक खिल्लारे, अंकुश वाणी, साहेबराव ढवळे, आण्णा खिल्लारे, महादेव ढवळे आदींमध्ये संशय निर्माण झाला आहे.

📞 डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर)

मो. ८१८०९२७५७२.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments