देगलूरमध्ये राष्ट्रवादीची शक्तीप्रदर्शक जाहीर सभा; विजयमाला टेकाळे यांच्या नेतृत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद


लोकनेता न्युज नेटवर्क

देगलूर (अमोल कुमार शिंदे) :-  देगलूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ. विजयमाला बालाजीराव टेकाळे आणि नगरसेवक पदाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभा उत्साहात आणि ऐतिहासिक उपस्थितीत पार पडली. शहरात राष्ट्रवादीच्या झेंड्यांनी नटलेल्या वातावरणात पक्षप्रमुखांचे आगमन होताच कार्यकर्त्यांच्या घोषणांनी सभा स्थळ दणाणून गेले.

या सभेच्या निमित्ताने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या शुभहस्ते अनेक नवीन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मा. अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत, पुरोगामी विचारधारेशी नाळ जुळवत केलेल्या या प्रवेशामुळे देगलूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट दिसले. नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्षांनी सर्वांना पक्षकार्यासाठी शुभेच्छा देत या निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी पक्षाचे मुख्य ध्येय म्हणजे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासाचा मार्ग प्रशस्त करणे असल्याचे सांगितले. देगलूर शहराच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी तळमळीने काम करणाऱ्या, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाचे स्पष्ट व्हिजन असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत संधी दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून देगलूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या सभेला राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार सुभाषराव साबणे, माजी आमदार अविनाशराव घाटे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर आदी मान्यवरांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सभेतील उत्साह, जनसमर्थन आणि नव्या प्रवेशांमुळे देगलूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक लढत आणखी जोमदार झाली असून आगामी दिवसांत पक्षाचा प्रचार आणखी वेग घेणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments