लोकनेता न्यूज नेटवर्क
सिंदेवाही (शरद नैताम) :- चारगाव (ब.) (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) या गावातील पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अत्याधिक वाढल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत चारगाव (ब.) तर्फे पंचायत समिती सिंदेवाही येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाण्यातील फ्लोराईडच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे स्थानिक ग्रामस्थांना दातांचे विकार, हाडांची कमजोरी तसेच विविध शारीरिक तक्रारी निर्माण होत आहेत. पाण्याच्या गुणवत्तेतील बिघाडामुळे नागरिकांना अनेक आरोग्य समस्या भेडसावत असून, याबाबत त्वरित उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीने प्रशासनाला विनंती केली आहे की, गावातील पाण्याचे नमुने तातडीने तपासून फ्लोराईडचे प्रमाण निश्चित करावे. जर ते प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास नियंत्रणासाठी योग्य जलशुद्धीकरण यंत्रणा बसवावी. तसेच, गावकऱ्यांना फ्लोराईडच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्यासाठी आरोग्य जनजागृती मोहीम राबविण्याची मागणीही ग्रामपंचायतीने केली आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत चारगाव (ब.) चे सरपंच, उप सरपंच आणि सदस्य तथा गावकरी यांनी पंचायत समिती सिंदेवाही येथील विकास अधिकाऱ्यांना तसेच उपविभागीय अभियंता पंचायत समिती सिंदेवाही यांना लेखी निवेदन देण्यात आले.
गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि आवश्यक ती पावले उचलून आरोग्यविषयक धोके टाळावेत, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment