परभणी व हिंगोली जिल्ह्यात 'राष्ट्रीय लोक अदालत'


लोकनेता न्युज नेटवर्क

परभणी (दत्तात्रय कराळे) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्यावतीने दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यालयालयात 'राष्ट्रीय लोक अदालतीं'चे आयोजन करण्यात आले आहे. 

        राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१ चेक बाऊन्स प्रकरणे, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, वीज (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल, बँकेचे वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवता येतात. वरील सर्व नमूद प्रकरणांसाठी १३ डिसेंबर रोजी आयोजित लोक अदालतीमध्ये संबंधित पक्षकार सहभाग घेऊ शकतात. 

        सदर लोक अदालतमध्ये प्रलंबित व दाखल सर्व प्रकरणात तडजोड करण्यासाठी माननीय न्यायाधीश व वकील यांचे पॅनल आपल्याला मदत करु शकणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. लोक अदालतमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास दाखल कोर्ट फीस संबंधित पक्षकारांना नियमानुसार परत मिळते.

        राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र प्रकरणे ठेऊन तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म.नंदेश्वर यांनी केले आहे.

        ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि ज्यांना ती प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची इच्छा आहे, त्यांनी त्यांच्या विधीज्ञांशी संपर्क करावा. अथवा अधिक माहितीसाठी व आपले प्रकरण दिनांक १३ डिसेंबर रोजी आयोजित लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी आणि हिंगोली यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव बी.एम. काळे यांनी केले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments