लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- आगामी नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूका कोणत्याही परिस्थितीत स्वबळावरच जिंकायच्या असा निर्धार जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष असलेले शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालकमंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर यांची पक्षातर्फे काल निवडणूक प्रभारी या पदावर नियुक्ती जाहीर केली आहे. तर निवडणूक प्रमुख म्हणून शहरी भागासाठी सुरेश वरपूडकर आणि ग्रामीणची रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्याला प्रथमच हक्काचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. जिल्ह्यातील एकमेव आणि दुसरी टर्म भाजपा आमदार असलेल्या मेघना बोर्डीकर यांना ती लॉटरी लागली आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष वाढीबरोबरच जिल्ह्याच्या विकासावर अधिक भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वसनीय म्हणून संबोधले जाणाऱ्या बोर्डीकर यांच्यावर अनेक महत्त्वपूर्ण अशा मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून मंत्रीमंडळ पटलावर जे काही निर्णय घेण्यात आले आहेत, त्यापैकी बहुतांश बाबी या विकासाच्या दृष्टीने उल्लेखनीय अशाच म्हणाल्या लागतील. महापालिका, जिल्हा परिषदा आणि नुकताच घोषित झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भरघोस असे यश मिळविणे शक्य व्हावे यासाठी मंत्री बोर्डीकर यांनी सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. या सर्व उल्लेखनीय कार्याचा लेखाजोखा ध्यानी घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर या निवडणूकीची जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. हे विशेष असेच म्हणावे लागेल.
नियोजित व संभाव्य निवडणुकांमध्ये भरीव असे यश मिळवता यावे यासाठी त्यांच्या दिमतीला निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार तथा मंत्री राहिलेले सुरेश वरपूडकर यांच्याकडे शहरी भागाची तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे ग्रामीणची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे निवडणूक कार्य आणि त्या अनुषंगाने आवश्यक अशा डावपेच कृतीचा बऱ्यापैकी चालना मिळू शकेल. या निवडणूका स्वबळावर लढवून त्या जिंकूनही दाखवणार असा विश्वास आमदार सुरेश वरपूडकर यांनीही व्यक्त केला आहे.
दरम्यान, भाजपाने घेतलेल्या स्वबळाचा भूमिकेमुळे सत्तेतील घटकपक्ष अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर आणि शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे व अन्य पदाधिकारी हे नेमकी काय भूमिका घेतात, हे सुध्दा बघणे आवश्यक ठरणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उबाठा शिवसेनेबरोबर घेतलेला युतीचा निर्णय हा जरी रायगड जिल्ह्यापुरता बोलला जात असला तरी तो परभणीत उपयोगी ठरला जाईल का, याचीही मोठ्या प्रमाणात चाचपणी केली जात असल्याचे कळतेय. तसे झाल्यास अगोदरच एक खासदार व एक स्थानिक आमदार असलेली उबाठा शिवसेना जिल्ह्यात अधिकच बळकट होऊ शकेल. त्यांच्या दिमतीला महाविकास आघाडीचे घटकपक्ष शरद पवार राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही असू शकतील हे वेगळे सांगायला नको. त्यातच वंचित बरोबर जाण्याच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेसची भूमिका काय राहिली जाईल हेही अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, परभणी शहर किंवा जिल्हा पातळीवर भाजपाला खरोखरच सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर मात्र आमदार रत्नाकर गुट्टे आणि भाजपा वगळता अन्य सर्वच पक्षांना एकत्र यावे लागणार आहे. आपला अहंकार आणि राजकीय जोडे (मतभेद) बाजूला सारून उबाठासह दोन्ही राष्ट्रवादी, कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी, महादेव जानकर यांची रासप व रिपाइई चळवळीचे घटक समाविष्ट सर्वपक्षीय आघाडी बनवली गेल्यास निश्चितच सत्ता मिळवणे शक्य तर होईलच त्याशिवाय भाजपची ही पूर्णपणे कोंडी होऊ शकेल.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment