लोकनेता न्युज नेटवर्क
हिमायतनगर (राम चिंतलवाड) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि राज्याच्या राजकारणातील युवा आयकॉन सुजातसाहेब आंबेडकर यांनी हिमायतनगरच्या वॉर्ड क्रमांक ७ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे एकमेव आणि निष्ठावान उमेदवार विशाल हनवते यांच्यासाठी केलेल्या प्रचाराने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले. सुजातसाहेबांच्या झंझावाती आगमनामुळे येथील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, त्यांच्या सभेला लोकांचा, समाजबांधवांचा प्रचंड मोठा आणि स्वयंस्फूर्त प्रतिसाद लाभला.
◼️ आंबेडकर घराण्याचे पाऊल हिमायतनगरला:
आंबेडकर घराण्याचे पाऊल आज हिमायतनगर शहराला लाभले, हा क्षण समस्त समाजासाठी भावनिक आणि ऐतिहासिक होता. सुजातसाहेबांनी आपल्या भाषणात अत्यंत स्पष्टपणे आणि धारदार शब्दांत काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतची युती तोडून केलेल्या विश्वासघाताचा घणाघात करत, हा केवळ राजकीय निर्णय नसून समाजाच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे, असे स्पष्ट केले. "येत्या निवडणुकीत मतपेटीतून काँग्रेसला त्याची जागा दाखवून द्या आणि धडा शिकवा," आणि जयश्रीताई विशाल हनवते यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
सुजातसाहेबांच्या भाषणाची मांडणी आणि त्यांच्या शब्दांतील सच्चेपणा यामुळे उपस्थित समाज अक्षरशः भावनिक झाला. बाबासाहेबांच्या वंशजांकडून मिळालेल्या या आवाहनाने समाजातील जुनी मरगळ दूर झाली आणि एक नवी ऊर्जा निर्माण झाली.
◼️ विशाल हनवते यांच्या नेतृत्वाला बळ:
या झंझावाताचा थेट फायदा वंचितचे उमेदवार विशाल हनवते यांना झाला आहे. हनवते हे हाडामासाचे कार्यकर्ते असून, निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर समाजाचे कोणतेही प्रश्न असोत, ते सर्वात आधी लोकांच्या मदतीला धावून जातात. त्यांची ही निस्सीम सेवा आणि आता सुजातसाहेबांचा भक्कम पाठिंबा यामुळे ते विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत.
सुजात आंबेडकरांच्या सभेमुळे निर्माण झालेली भावनिक लाट इतकी तीव्र आहे की, प्रस्थापित पक्षांना धडा शिकवण्याचा निर्धार समाजाने जाहीरपणे केला आहे. अनेक वर्षांपासून प्रस्थापित पक्षांकडून होत असलेल्या दुर्लक्षाची खदखद या सभेमुळे बाहेर पडली.
◼️ राजकीय वारे फिरले:
राजकीय विश्लेषकांच्या मते, सुजातसाहेबांच्या एकाच उपस्थितीमुळे हिमायतनगर वॉर्ड ७ मधील राजकीय वारे पूर्णपणे फिरले आहेत. समाजाने आता एकजुटीने विशाल हनवते यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, एकगठ्ठा मतदान वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सुजातसाहेबांनी निर्माण केलेल्या या भावनिक आणि वैचारिक लाटेमुळे वॉर्ड ७ मध्ये वंचित बहुजन आघाडीची विजयाची पताका फडकणार, यात शंका नाही.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment