"घाटकुळ" आदर्श गावातील अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहारात ग्रामसेवकाचा सहभाग....? आदर्श’ पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक संशयाच्या भोवऱ्यात शिपाई ते ग्रामसेवक—वादग्रस्त कारकिर्द पुन्हा चर्चेत


लोकनेता न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी (आशिष निमगडे) :- पोंभुर्णा तालुक्यात उघडकीस आलेल्या २०२४ मधील अतिवृष्टी अनुदान वितरणात बोगस शेतकरी दाखवून झालेल्या गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.तालुक्याबाहेरील व्यक्तींना बनावट सातबारे तयार करून पात्र शेतकरी ठरवण्यात आले आणि लाखो रुपयांचे अनुदान हडप केल्याचा आरोप काँग्रेस नेते वैभव पिंपळशेंडे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.या प्रकरणामागे काही प्रशासनिक घटकांचे संगनमत असल्याची शंका व्यक्त होत असून एक ग्रामसेवक हा संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

सदर ग्रामसेवकाचा भूतकाळही तितकाच वादग्रस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.करंजी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला सुरुवात केलेल्या या कर्मचाऱ्याने नंतर ग्रामसेवकपदापर्यंत मजल मारली; मात्र त्याच्या कार्यकाळात अनेक संशयास्पद प्रकरणांची चर्चा झाली.करंजी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण, सामान्य निधीतील अनियमितता,घरकुल पात्रतेतील गैरव्यवहार यांसह अनेक मुद्दे त्या काळात ऐरणीवर आले होते.

विशेष म्हणजे,या वादग्रस्त प्रकरणांनंतरही सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून त्याला ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे घाटकुळ ग्रामपंचायतीला त्याच्या कार्यकाळात मिळालेल्या विविध पुरस्कारातील लाखो रुपयांच्या काही निधी वापराबाबतही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टी अनुदानातील बोगस शेतकरी प्रकरणाने या सर्व अनियमिततेचे रूप पुन्हा उघड केले आहे. 

पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ (आदर्श गाव) येथे सन २०२१ ते २०२५ दरम्यान शासनाच्या आधार नोंदी,सातबारा उतारे आणि अनुदान वितरण यंत्रणेचा गैरवापर करून बनावट शेतकरी तयार करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

शेती नसलेल्या आणि तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून त्यांना शेतकरी घोषित करण्यात आले.या व्यक्तींना वाढीव आराजी दाखवून लाखोंचे अनुदान मिळवून देण्यात आले. प्रत्यक्षात या लोकांचा गावाशी कोणताही संबंध नसतानाही त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आल्याने ग्रामस्थांत संताप उसळला आहे.

दरम्यान,अनुदान मिळाल्यानंतर ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांकडून परत घेऊन काही खास मंडळी व एजंटांमध्ये वाटप केल्याचे प्राथमिक पुरावे पुढे आले आहेत.हे संपूर्ण प्रकरण प्रशासनातील काही जबाबदार अधिकाऱ्यांच्या संगनमताचा स्पष्ट संकेत देणारे आहे.

घाटकुळ ग्रामपंचायतीतील अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार संपूर्ण प्रकरणाचा स्वयंस्पष्ट अहवाल पोंभुर्णा तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला असून,दोषींवर कठोर कारवाईची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

दरम्यान,बनावट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान म्हणून जमा झालेली रक्कम शासन खात्यात परत जमा करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

पुढील काही दिवसांत नवे खुलासे समोर येण्याची दाट शक्यता आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments