श्री क्षेत्र आळंदी देवाची ते लोणीकंद फाटा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

लोकनेता न्यूज नेटवर्क

आळंदी देवाची | इम्रान हकीम :- कार्तिकी वारी व संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा अवघ्या आठ दिवसावर आला असून लोणीकंद फाटा ते आळंदी देवाची या रस्त्यावर सोळू, धानोरे फाटा या गावाच्या हद्दीत मोठ मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे आळंदी ते लोणीकंद फाटा हा रस्ता खऱ्या अर्थाने मृत्यूचा सापळा बनला आहे. 

  दुचाकीस्वार, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक,महिला,शेतकरी, वारकरी, भाविक यांना जीव मुठीत धरून नादुरुस्त रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. जड वाहतुक करणारे कंटेनर, अवजड वाहने पी. एम. पी. बस, कामगार बस, शालेय विद्यार्थी बस,रिक्षा, टेम्पो, जड वाहने यावरील वाहन चालकांना वाहने चालविता़ंना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते हेच समजत नसल्यामुळे दररोज वाहने नादुरुस्त होणे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होणे, अपघात यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. सोळू, धानोरे फाटा येथील खड्ड्यांमुळे एखाद्याचा निष्पाप बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम होईल का ? 

     या नादुरुस्त रस्त्यामुळे गेल्या सहा महिन्यात या रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या व मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांची माहिती आळंदी पोलीस ठाणे, पिंपरिचिंचवड  पोलीस आयुक्तालय, लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्याकडून घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

     आळंदीला जोडणारा मुख्य रस्ता लोणीकंद फाटा ते आळंदी हा असून रांजणगाव, कारेगाव, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, फुलगांव, मरकळ, धानोरे, सोळू, या औद्योगिक भागात जाणाऱ्या जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात सुमारे तीनशे कारखाने आहेत. या रस्त्याबाबत तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष का करतात?  'आंधळ दळतंय व कुत्र पीठ खातय अशी दयनीय अवस्था नागरीकांची झाली आहे. संत श्रेष्ठ श्री. माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकरी भाविकांचे, ज्येष्ठ नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत.वाहनांच्या स्पेयर पार्टचे नादुरुस्त रस्त्यामुळे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी एखादे वाहन नादुरुस्त झाले तर आठ ते दहा किलोमीटर वाहनांच्या  रांगा लागतात.

    या रस्त्यावरील साइड पट्ट्यांची कामे अपूर्ण असून यारस्त्यावर चोवीस तास वाहतूक मोठ्या प्रमाणात असूनही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष का करतात असा ग्रहण प्रश्न निर्माण झाला आहे. कार्तिकी वारी साठी पुणे— अहिल्यानगर महामार्गावरून मराठवाडा तसेच सोलापूर—नगर जिल्ह्यातील वारकरी याच नादुरुस्त रस्त्यावरून प्रवास करतात. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित  या रस्त्याची पाहणी करून धानोरे फाटा, सोळू येथील रस्त्याचे काम करावे अशी मागणी सोळू गावचे माजी सरपंच श्री. पंडितभाऊ गोडसे व सोळू गावचे माजी उपसरपंच श्री. विश्वास गुजर यांनी केली आहे.

________________________


🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in

0/Post a Comment/Comments