निमगाव वायाळ येथे कुपटीनेच शेत खाल्याचा प्रकार

फिल्टर बसण्यासाठी 2.5 लाख खर्च तर दुरुस्ती साठी 7 लाख

ग्रामविकास अधिकारी शिंगणे यांच्या कामकाजावर गंभीर आरोप

गैरप्रकारात पंचायत समितीतील एका विस्तार अधिकार्‍याचा ही समावेश

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा | ज्ञानेश्वर बुधवत :- निमगाव वायाळ ग्रामपंचायतीत विकासकामांशी संबंधित प्रचंड आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता आणि निधीचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप ग्रामविकास अधिकारी के. एल. शिंगणे यांच्या विरोधात करण्यात आले आहेत. पत्रकार सुरेश लक्ष्मण हुसे यांनी दि १४ नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी अजित बांगर यांच्याकडे याबाबत सविस्तर तक्रार सादर केली असून चौकशीची मागणी केली आहे.

      ग्रामीण भागात स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने १५व्या वित्त आयोगातून आरओ फिल्टर बसविण्यात आला होता. यासाठी प्रत्यक्ष खर्च ₹२.५७ लाखांचा झाला. मात्र काही महिन्यांतच त्याच फिल्टरच्या “दुरुस्ती”च्या नावाखाली ₹७ लाखांचा खर्च दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

       दुरुस्तीची प्रत्यक्ष कामे दिसत नसल्याने या व्यवहारावर संशय व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायत निधीतून गावातील नागरिकांसाठी पिठाची गिरणी खरेदी करण्यात आली. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गिरणीचा गावकऱ्यांनी कधीच वापर केला नाही, तर ग्रामविकास अधिकारी यांनी स्वतःच्या घरगुती कामांसाठीच गिरणीचा वापर केल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.

     ग्रामपंचायत निधी सरपंच आणि सचिव यांच्या संयुक्त अधिकृत खात्यातून चालवला जाणे आवश्यक असते. परंतु शिंगणे यांनी स्वतःच्या वैयक्तिक PAN कार्डावर ग्रामपंचायतचे खाते जोडून व्यवहार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार शिस्तभंगासोबतच फौजदारी गुन्हा ठरू शकतो, असे तक्रारदारांनी नमूद केले आहे.

       गावातील रस्त्यांवर टाकलेला मुरूम, बांधकामे आणि इतर विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जा, बनावट बिले आणि जास्तीचे खर्च दाखविणे यांसारख्या अनियमितता समोर आल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. शिंगणे यांनी निमगाव वायाळपुरतेच नाही तर किनगाव राजा आणि इतर ग्रामपंचायतीतही अशाच प्रकारचे गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्याचे सांगण्यात येते.

  सिंदखेड राजा पंचायत समितीतील एका विस्तार अधिकाऱ्याने आर्थिक देवाणघेवाण करून तक्रारी दडवल्या असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.

तक्रारीत पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —

  1. स्वतंत्र (त्रयस्थ) संस्थेमार्फत सखोल चौकशी,
  2. ग्रामविकास अधिकारी शिंगणे व संबंधित विस्तार अधिकाऱ्यांचे निलंबन,
  3. गावनिधीच्या अपहाराची वसुली करून शासनाकडे जमा करणे,महसूल व पोलीस विभागामार्फत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई

या सर्व प्रकारामुळे निमगाव वायाळ ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार थांबवून पारदर्शक कारभार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

________________________


🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in

0/Post a Comment/Comments