किनगाव राजा ग्रामपंचायत सदस्या विदया साळवे अपात्र घोषित!
लोकनेता न्युज नेटवर्क
किनगाव राजा | महेश मुंढे :- सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडवणारा निकाल जाहीर झाला असून ग्रामपंचायत सदस्या विदया दिपक साळवे यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून अपर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी अपात्र घोषित केले आहे! महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४ (१)(ज-३) अंतर्गत हा निर्णय देण्यात आला असून, या आदेशामुळे ग्रामपंचायतीत आणि स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. प्रकरणाचा उगम — “सरकारी जागेवर अतिक्रमण”
अर्जदार विठोबा कुंडलीक चवरे (रा. किनगाव राजा) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदस्या विदया साळवे या त्यांच्या पती आणि कुटुंबासह राहत असून त्यांच्या पतीने शासकीय मालमत्ता क्र. ५४ वर २०x३० फूट क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे.
सदर जागेचा कर देखील दिपक तोताराम साळवे यांनी भरल्याचे रेकॉर्डवर असल्याने, सदस्या या अप्रत्यक्षपणे अतिक्रमणाचा लाभ घेत आहेत आणि त्यामुळे त्या ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन करीत आहेत, असे अर्जदाराने नमूद केले.
बचावाचा प्रयत्न पण उपयोग नाही!
गैरअर्जदार विदया साळवे यांनी मात्र या आरोपांना फेटाळून लावत, आपण मालमत्ता क्र. १४२८ वर राहत असल्याचा दावा केला. त्यांनी ही तक्रार राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आली असल्याचा आरोप केला. मात्र, दाखल केलेल्या ग्रामपंचायत नोंदींमध्ये मालमत्ता क्र. ५४ ही सरकारी जागा असून भोगवटदार म्हणून दिपक साळवे यांचे नाव कायम असल्याचे आढळून आले.
प्रकरणातील दाखले तपासल्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की —
"गैरअर्जदार विदया साळवे या आपल्या पतीसह एकत्र कुटुंबात राहतात. त्यांच्या पतीने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असून त्या स्वतः त्या जागेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यांनी अधिनियमाच्या कलम १४(१)(ज-३) चे उल्लंघन केले आहे.”
या सर्व बाबींचा विचार करून अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी विदया साळवे यांना ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अनर्ह (अपात्र) ठरवले.
तसेच आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य राहण्याचा कोणताही अधिकार नाही.
या आदेशानंतर किनगाव राजा ग्रामपंचायतीत तसेच सिंदखेडराजा तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. विदया साळवे या सत्ताधारी गटातील महत्त्वाच्या सदस्यांपैकी असल्याने हा निर्णय स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरणार आहे.
“सरकारी जागा म्हणजे जनतेची मालमत्ता; त्यावर अतिक्रमण करणाऱ्याला जनतेचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही!” — अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा
________________________
Post a Comment