लोकनेता न्युज नेटवर्क
बीड (पांडुरंग हराळे) :- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान “हमारा शौचालय – हमारा अभिमान” ही विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील १३५६ गावांमधील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती व रंगकाम करून ती सुस्थितीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभागांनी एकत्रितपणे ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी केले होते.
मात्र प्रत्यक्षात ही मोहीम कागदोपत्रीच राबवली जात असल्याच्या तक्रारी विविध ठिकाणांहून येत होत्या. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेश) यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्फत पालकमंत्री अजितदादा पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना लेखी तक्रार केली होती.
२ वर्षांपासून शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांची त्रासदायक परिस्थिती
लिंबागणेश केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या अंतर्गत असलेल्या बेलगाव वस्तिशाळेत मागील दोन वर्षांपासून शौचालय उपलब्ध नव्हते.
यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
ग्रामस्थांनी शाळेसाठी ६ गुंठे जमीन दान करून इमारत बांधून दिली होती. गेल्या आठवड्यातच रंगरंगोटी, लाईट फिटींग, पंखे इत्यादींसाठी लोकवर्गणीतून सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च केला होता. तरीदेखील शौचालयाचे काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला होता.
याबाबत ग्रामस्थांनी डॉ. गणेश ढवळे यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
प्रसारमाध्यमांचे आभार : लेखी पाठपुराव्यास अखेर यश
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर डॉ. ढवळे यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली, विद्यार्थ्यांशी व पालकांशी चर्चा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तसेच मंत्र्यांना तत्काळ लेखी निवेदन दिले.
यानंतर विविध वृत्तपत्रांनी या समस्येचा पाठपुरावा करत बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रसारमाध्यमांच्या दणक्याने प्रशासन अखेर जागे झाले आणि बेलगाव वस्तिशाळेसाठी २ शौचालयांच्या बांधकामासाठी ६ लाख रुपये निधी मंजूर करत प्रशासकीय मान्यता दिली.
ग्रामस्थ आणि डॉ. गणेश ढवळे यांनी प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले आहेत.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
.jpg)
Post a Comment