परभणी जिल्ह्यात "लोकशाहीची पायमल्ली" एका मताला वाटले रुपये १०-१५ हजार पाथरी तालुक्यात १०० तर जिल्ह्यात २५० कोटींची उलाढाल भाजप, शिंदे सेना अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पैशांचा प्रचंड अतिरेक उबाठा खासदार संजय जाधव यांचा प्रहार


लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- एका बाजूला सनातन धर्माच्या गप्पा-गोष्टी करायच्या तर दुसऱ्या बाजूला कोंबडे, दारु आणि मटण पार्ट्यांची झोड उठवणाऱ्या भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांनी काही तरी नीतीमता पाळायला पाहिजे होती. परंतु ज्यांनी साफ नाकालाच गुंडाळली आहे, त्यांना नीती आणि धर्म कसला काय असा अनेक गंभीर आरोप करत परभणीचे उबाठा खासदार संजय जाधव यांनी महायुतीचे साफ वाभाडेच काढले. 
       नुकताच पार पडलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सत्ताधारी महायुतीकडून अमाप अशा पैशांचे खुलेआम वाटप करण्यात आले. एका बाजूला मतदार याद्यांमध्ये कमालीचा घोळ करण्यात आला. आपल्या पक्षाला मतदान होणार नसल्याचे ध्यानी घेऊन याच सत्ताधारी मंडळींनी वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या नागरिकांची नांवे अन्यत्र यादीमध्ये घुसवून विरोधकांची एकगठ्ठा मते गायब केली तर मृत्यू पावलेली, स्थलांतरित झालेली किंवा जे हयात आहेत, अशांचेही मतदान आपल्याच हस्तकांकरवी करुन हक्काच्या मतदानापासून शेकडो जणांना वंचित ठेवण्याचे प्रकार जाणीवपूर्वक घडविले गेले. तर, दुसरीकडे कायदा धाब्यावर बसवून मतदारांना आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांचे वाटप करुन लोकशाहीचा गळा घोटला गेला. प्रसंगी त्यासाठी कित्येकांवर दहशत निर्माण करुन त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून धमक्या देण्यात आल्या. एवढेच नाही तर काही ठिकाणी बळाचा वापर करून जीवघेणे हल्ले घडवून आणले गेले. त्यासाठी धारदार चाकू, सुऱ्यांचा धाक दाखवण्यात आले तर काही ठिकाणी घातक अशा शस्त्रांचाही वापर केला गेला. राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा काही काळ वगळता त्याच्या अगोदर व नंतर भाजपासह महायुतीचेच सरकार सत्तास्थानी होते व आजही तेच आहे. असं असताना विकासाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा मतदार याद्यांमध्ये घोळ आणि पैशांचे खुलेआम वाटप करुन महायुती सरकारने अक्षरशः लोकशाहीचा गळा घोटला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 
       शेतकऱ्यांचं कर्ज माफ करुं, सातबारा कोरा करुं, वीज बिल माफ करुं, वर्षाकाठी करोडो तरुणांना नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करुं, शेती उत्पादीत मालास हमीभाव देऊ, दर्जेदार शिक्षण देऊ, २४ तास मोफत व नियमित आरोग्य सेवा उपलब्ध करुं, महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व आर्थिक मदत उपलब्ध करुन देऊ, एक रुपयात पिक विमा देऊ, नैसर्गिक नुकसान तातडीने देऊ अनेक आश्वासने निवडणुकीच्या अगोदर जाहीरपणे देणाऱ्या या सरकारने पुन्हा सत्ता काबीज केल्यानंतर मात्र वरील सर्वच आश्वासनांचा त्यांना पूर्णतः विसर पडला गेला यापेक्षा दुर्दैव ते कोणते म्हणायचे ? असे अनेक संतप्त सवाल जनतेतून विचारले जात आहेत. ज्या लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तास्थानी आरुढ झाले, त्याच बहिणींवर फसगत केल्याचा आरोप ठेवून या सरकारने त्याच बहिणींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा प्रसंगी त्यांना जेलची हवा दाखवण्याचा इशारा सुध्दा या सरकारने दिला आहे. त्यामुळे या सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
       परभणीत उबाठाचे खासदार संजय जाधव यांनी तर या सरकारवर अनेक प्रहार करुन खळबळ उडवून दिली आहे. माध्यमांशी बोलतांना अत्यंत उद्विग्नपणे या सरकारला उद्देशून ते म्हणाले की, जनाची नाही पण मनाचीही लाज न बाळगता या सरकारने जो हैदोस घातला, नंगा नाच चालविला, ही शोकांतिकाच म्हणता येईल असं म्हणाले. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत पाथरी तालुक्यात १०० कोटी तर संपूर्ण परभणी जिल्ह्यात २५० कोटींची उलाढाल झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी या सरकारच्या नीतीमतेवर ठेवला आहे. 
       परभणी जिल्ह्यात सर्वत्र बेबंदशाही सुरु असल्याचे निवडणूक काळात निदर्शनास आले. ते पुढे असंही म्हणाले की, महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी व मित्र पक्षांनी एकेका मतांसाठी दहा ते पंधरा हजार रुपये वाटले. एवढेच नाही तर तीव्र संताप व्यक्त करीत त्यांनी पाथरी तालुक्यात १०० कोटी तर संपूर्ण परभणी जिल्ह्यात तब्बल २५० कोटींची उलाढाल झाली असल्याचा दावा खा.जाधव यांनी केला आहे. भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पैशांचा प्रचंड अतिरेक केल्याचा प्रहारही खा.जाधव यांनी निदर्शनास आणले आहे. 
       यावेळी खा.जाधव‌ यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावरही चांगलेच तोंडसुख घेतले. सत्ताधारी भाजपाच्या मेघना बोर्डीकर या जिंतूरच्या आमदार असल्या तरी त्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सुध्दा आहेत. तथापि सत्तेमध्ये असल्याने त्यांनी भरमसाठ असा निधी उपलब्ध करून विकास कामांवर मोठ्या प्रमाणात जोर देणे अपेक्षित होते. मात्र तसं काही न करता त्या स्वतःला 'लेडी डॉन' समजतात. असं म्हणून त्या स्वतःच आपली पाठ थोपटून घेत आहेत, यापेक्षा दुर्दैव ते कोणतं म्हणायचं, अशी परखड टीका सुध्दा खा.जाधव यांनी केली आहे. 
       एकूणच काय तर राज्याबरोबरच बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली येथील अनेक भयाण प्रकार लक्षात घेता मराठवाड्यातील सर्वच ठिकाणची निवडणूक महायुती सरकारने जवळ जवळ हायजॅक केल्याचेच दिसून आले. त्यामुळे मतदार राजा पूर्णतः घाबरलेला होता, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पर्यायाने परभणी जिल्ह्यात 'लोकशाहीची पायमल्ली' झाली असंच म्हणता येईल.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments