भिमराया घे तुला या लेकराची वंदना


लोकनेता न्युज नेटवर्क

पुणे (प्रतिनिधी) :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज ६९ वा महापरिनिर्वाण दिवस हा दिवस म्हणजे फक्त इतिहासातील एक तारीख नाही, तर देशातील प्रत्येक जागरूक नागरीकाला थांबून स्वतःकडे पाहायला लावणारा क्षण आहे.बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचा प्रवाह, आणि त्यागाची समुद्रासारखी अथांग खोली. त्यांनी जगाला दाखवून दिले की माणूस जन्माने नव्हे, तर आपल्या विचारांनी आणि कर्मांनी महान ठरतो. वंचितांच्या वेदना जाणणारे, समाजातील विषमता उखडून टाकणारे आणि मानवी स्वातंत्र्याच्या लढ्याला दिशा देणारे ते एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. महामानवाच्या महापरिनिर्वाणानंतर कित्येक दशकं उलटली, पण त्यांचे विचार आजही तितकेच ताजे, तितकेच धगधगते, आणि तितकेच मार्गदर्शक आहेत. कारण ते व्यक्ती नव्हते ते एक चळवळ होते, आणि आजही आहेत.

भगवान बुद्धांचे करुणामय विचार त्यांनी ज्या निष्ठेने आत्मसात केले, तीच करुणा त्यांनी सामाजिक न्यायाच्या कार्यात वाहिली. बुद्धधम्माचा प्रसार हा त्यांच्या मनातील महान मानवप्रेमाचा विस्तार होता कारण हा मार्ग अपराध नसलेला, द्वेष नसलेला, फक्त सत्य आणि मैत्रीने भरलेला मार्ग आहे.

आजच्या या महत्त्वपूर्ण दिवशी बाबासाहेबांसमोर आपण शब्दांनी नव्हे, तर ठाम संकल्पांनी नतमस्तक व्हायचे आहे. समाजातील जाती, भेद, विषमता, अंधश्रद्धा या सर्व गोष्टींच्या विरुद्ध लढणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना दिलेली श्रद्धांजली. शिक्षण घेणे, विवेकाने विचार करणे, विज्ञानाला आदर देणे, आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणे यातूनच त्यांचे स्वप्न साकार होणार आहे.

महामानवाला विनम्र, कृतज्ञ आणि हृदयपूर्वक आदरांजली. 

पँथर जयदीप बगाडे दौंड.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments