छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास विरोध, "भाजपा सरकारचा तीव्र निषेध"



लोकनेता न्युज नेटवर्क

परभणी (दत्तात्रय कराळे) :- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर शिवरायांचा पुतळा उभारण्यास नकार देणाऱ्या मोदी सरकारचा परभणी जिल्हा बहुजन विकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे. 

        राज्य व देशपातळीवर, इतकेच नाही तर गावखेड्यांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणूका जिंकण्यासाठी सुध्दा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे सातत्याने बेगडी राजकारण केले आहे, त्या भाजपाचा खरा चेहरा या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. 

       मुंबईतील छत्रपती टर्मिनस समोर शिवरायांचा पुतळा उभारणे 'हे आमच्या धोरणात बसत नाही', असे संतापजनक उत्तर रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले असल्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशपातळीवर 'त्या' वक्तव्याच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. 

       महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीस आणि तोही चक्क महाराष्ट्रात विरोध करणे म्हणजे वाघाच्या शेपटीवर पाय देण्यासारखेच आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकीय पोळ्या शेकणाऱ्या याच मोदी सरकारला गुजरातेत मात्र 'त्या' धोरणाचा विसर पडला आहे. जेथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे एक नाही तर चक्क दोन दोन पुतळे उभारले गेले आहेत. त्या गुजरातसाठी मात्र शासनाचे धोरण वेगळे आणि महाराष्ट्रासाठी वेगळे धोरण लावून सापत्न भावाची वागणूक, मोदी सरकारची ही दोगली वृत्ती व नीती अत्यंत अशोभनीय अशीच म्हणता येईल. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे राज्यमंत्र्यांच्या 'त्या' कथित विधानाचा जाहीर निषेध करणारे निवेदन परभणी जिल्हा बहुजन विकास आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. 

       खेदाची बाब म्हणजे शिवरायांच्या पुतळ्यासाठी नियमांचा बाऊ करणाऱ्या याच रेल्वे राज्यमंत्र्यांना आणि रेल्वे विभागाला गुजरातच्या एकता नगर स्टेशनवर चक्क दोन दोन पुतळे उभारल्याचा विसर कसा पडू शकतो, असा सवालही परभणी जिल्हा बविआतर्फे विचारला जात आहे. गुजरातसाठी नियम खुंटीवर ठेवू पहाणाऱ्या मोदी सरकारला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या बाबतीत असलेला आकस निंदनीय असाच म्हणता येईल. तथापि छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र यांच्यातील ऋणानुबंध मोदी सरकारलाच नव्हे तर अन्य कोणालाही ते कदापि वेगळे करता येणार नाहीत, याचे भान संबंधित मंत्र्यांना असायला हवे. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आम्हालाही मनस्वी आदर आहे. त्यांचा उदोउदो होणे हे जसे क्रमप्राप्त आहे, किंबहुना छत्रपती शिवरायांचाही तसाच मान सन्मान व आदर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर सर्वत्र राखला जाणे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकेकाळी त्याच सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी आणून भाजपाला पूरते जेरीस आणले होते, हे सुध्दा सर्वश्रुत आहे. 

       रेल्वे स्टेशनवर शिवरायांचा पुतळा उभारणी 'धोरणात बसत नाही' असा जावई शोध लावू पहाणाऱ्या रेल्वे विभागाने हाच नियम गुजरातमध्ये खुंटीला टांगला होता का, असा परखड सवाल करत बविआने रेल्वे राज्यमंत्र्यांच्या बुध्दीची कीव केली आहे. केवडियाचे नामांतर करुन निर्माण एकता नगर रेल्वे स्टेशन समोर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. एवढेच नाही तर स्टेशनच्या आतील भागातही सरदार पटेलांचा पुतळा आहे. त्याशिवाय स्टेशन समोरील मुख्यालय असलेल्या इमारतीवर म्युरल लावून त्याद्वारे पटेलांची छायाचित्रे प्रदर्शित करण्याची परवानगी मोदी सरकारनेच दिली आहे. ही सर्व प्रणाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही महाराष्ट्रात, मुंबईच नव्हे तर राज्यातील प्रमुख विभागीय रेल्वे स्थानकांच्या इमारतींवर कार्यान्वित करुन शिवरायांचा 'तो' इतिहास पुन्हा जागृत ठेवला जाणे आवश्यक असल्याचेही बविआ जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कराळे यांचे म्हणणे आहे. शिवरायांचा पुतळा आणि त्यांच्या शौर्याबाबत मोदी सरकारने कोणताही आकस न ठेवता रेल्वे विभागाला उद्युक्त केले जाणे आवश्यक आहे. नव्हे, तशा तातडीने सूचना देऊन दोन्ही उपक्रमांना चालना देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा मोदी सरकारचे शिवरायांवर असलेले कथित बेगडी राजकारण चव्हाट्यावर आणले जाईल. राज्यमंत्र्यांच्या कथित विधानाचा जाहीर निषेध करत आगामी निवडणुकांच्या प्रचार कार्यातूनच त्याला सुरुवात केली जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

लोकभावना जाणून घेण्याचा प्रयत्न

      उबाठा शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यानुषंगानेच दैनिक लोकन्याय संघर्ष या मराठी नियतकालिका द्वारा यावर प्रकाश टाकून लोकभावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments