बल्लूरफाटा ते मानूर रस्त्याचे काम निकृष्ट, चौकशीची मागणी शासनाचा निधी घशात घालण्याचा गुत्तेदाराचा डाव.


लोकनेता न्युज नेटवर्क

देगलूर (अमोल कुमार शिंदे) :- तालुक्यातील बल्लूर फाटा ते मानूर या आंतरराज्य सीमा जोडणाऱ्या रस्त्यावर थातूरमातूर काम करून खड्डे बुजविले जात आहेत. शासनाचे नियम व अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखवत या रस्त्यावर केवळ गुत्तेदाराच्या मनमर्जीप्रमाणे काम सुरू असल्याने लाखोंचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच बुजविलेल्या खड्यांनी पूर्वीचे स्वरूप धारण केले असताना परत तोच कित्ता गिरवला जात असल्याने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अंकुशराजे जाधव यांनी केली आहे. 

तेलंगणा व कर्नाटक या दोन राज्यांसह सीमावर्ती भागातील ४० ते ५० गावखेड्यांना जोडणाऱ्या बल्लूर फाटा ते मानूर राज्यसीमा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या रस्त्याचे काम करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासन व राजकीय लोकांकडे लावून धरली होती. अशातच काही महिन्यांपूर्वी या कामाचे आदेश काढून रस्त्याची डागडुजी हाती घेण्यात आली. परंतु भ्रष्ट व्यवस्था व लालची गुत्तेदाराच्या संगनमताने या रस्त्यावर केवळ डांबर- गिट्टीचे मिश्रण नैवेद्य स्वरूपात दाखवून लाखो रुपयांचा निधी खिशात घाल्याने सत्कार्य केले जात असल्याच्या उपलब्ध कामावरून दिसुन येत आहे. या भागातील काही नागरिक व कार्यकर्त्यांनी संबंधित निकृष्ट काम हे पायातील जोड्याने उखडत असल्याचा उत्कृष्ट व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करूनदेखील बांधकाम विभागाने आपली झोपमोड होऊ दिली नाही हे विशेष. गेल्या काही वर्षांत कोट्यवधींचा निधी कुणासाठी खर्च केला गेला? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सदर रस्त्यावरील निकृष्ट काम त्वरित थांबविण्यात येऊन स्वतंत्र गुणवत्ता तपासणी पथक अथवा तांत्रिक अधिकारीयांनी प्रत्यक्ष पाहणी करावी संबंधित कंत्राटदार व कामाच्या जबाबदार अधिकारी यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत व शासन नियमांनुसार गुणवत्तापूर्ण रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात यावे. अशी मागणी अंकुशराजे जाधव यांनी केली आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments