लोकनेता न्यूज नेटवर्क
हिमायतनगर (राम चिंतलवाड) :- सिरंजनी गावातील शासकीय रेशन दुकानात मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रेशन दुकानातून धान्य वाटप करताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असून, काही वेळा संबंधित दुकानदार मद्यधुंद अवस्थेत रेशन वाटप करत असल्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी केला आहे.
या गंभीर प्रकरणी सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी 15 डिसेंबर रोजी तहसीलदार हिमायतनगर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित रेशन दुकानदार तसेच दुर्लक्ष करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात लाभार्थ्यांना धान्य कमी देणे, अपात्र व्यक्तींना रेशन वाटप, नोंदींमध्ये अनियमितता तसेच गैरप्रकार करून शासकीय धान्याची अफरातफर केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या गैरप्रकारांमुळे गरीब व गरजू नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या सहकार्याने अमर उपोषण छेडण्याचा इशाराही सरपंचांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे सिरंजनी गावात खळबळ उडाली असून तहसील प्रशासन या तक्रारीची दखल कधी घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment