श्री संत भगवानबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भगवानगडावर उसळला भाविकांचा जनसागर



लोकनेता न्यूज नेटवर्क

भगवानगड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं दैवत ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबा यांचा काल श्री क्षेत्र भगवानगडावर भव्य दिव्य पुण्यतिथी महोत्सव संपन्न झाला. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र भगवानगडावर भव्य दिव्य मंडप उभारणी केली होती. भाविकांसाठी सुमारे शंभर क्विंटल साखरेपासून महाप्रसाद बनवला होता. वाहनांच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केलेली होती. भाविकांच्या वाहनांच्या सुयोग्य पार्किंग व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनासह घोगस पारगांव आणि भारजवाडीतील तरुणांवर जबाबदारी दिलेली होती. पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अनेक संस्थानांहून व गावांतून लहान-मोठ्या अनेक दिंड्या श्री क्षेत्र भगवानगडावर आल्या होत्या. मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काटेकोरपणे सर्व देखरेख केली होती.

    काल सकाळी ९ वाजता ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांच्या समाधीची महापूजा संपन्न झाली. दुपारी १२ वाजता श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करून पुण्यतिथी कार्यक्रमाची सांगता झाली. भाविकांसोबत महंत शास्त्रीजींनी स्वतः स्टेजवर बसून श्री संत भगवानबाबांच्या पुण्यतिथीचा प्रसाद घेतला. 

       पुण्यतिथी सोहळ्यासाठी जमलेल्या लाखो भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था, संभाव्य चोरट्यांपासून महिलांची सुरक्षितता व इतर सुयोग्य व्यवस्थापनासाठी घोगस पारगांव, भारजवाडी, भालगांव आणि एकनाथवाडीचे स्वयंसेवक पोलीस प्रशासनाला सहकार्य केले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments