लोकनेता न्यूज नेटवर्क
हिमायतनगर (राम चिंतलवाड) :- वारंग टाकळी येथील शेत सर्वे नंबर ७२, ७३ व ८३ मध्ये असलेल्या विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात ऊस शेती जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत येथील शेतकरी रंगराव लक्ष्मण गाडेकर, दयाळ कैलासगीर गीरी व सुरेश मामीडवार यांचे ऊस पीक पूर्णपणे नष्ट झाले असून शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
या शेतामधून जाणाऱ्या विद्युत वाहिन्या, डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) व कट पॉईंट अत्यंत धोकादायक स्थितीत असून, याबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
आगीत ऊस पिकासह ठिबक सिंचन व्यवस्था, खत, बियाणे तसेच शेतीसाठी केलेली मेहनत एका क्षणात भस्मसात झाली आहे. ऊस हे शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन असल्यामुळे या घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकरी व शेतकरी घटनास्थळी धावून आले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ऊस शेती जळून खाक झाली होती. महसूल व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment