लोकनेता न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा (प्रतिनिधी) :- सध्या सर्वत्र 'रस्ता सुरक्षा सप्ताह' साजरा केला जात असताना, सिंदखेड राजा शहरात एक धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हाती पालकांनी थेट दुचाकी सोपवल्या असून, हे विद्यार्थी विनापरवाना आणि 'ट्रिपल सीट' प्रवास करताना दिसत आहेत. या गंभीर प्रकारामुळे आता या मुलांच्या पालकांवर मोटार वाहन अधिनियमानुसार (Motor Vehicles Act) कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सिंदखेड राजा शहरात दररोज १० ते १५ किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी शाळेत येतात. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे अल्पवयीन असून त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना (License) नाही.धक्कादायक बाब म्हणजे, हे विद्यार्थी नियमांची पायमल्ली करत एकाच दुचाकीवर तीन-तीन जण बसून (ट्रिपल सीट) सुसाट वेगाने वाहने चालवतात. पालकांच्या संमतीनेच हा प्रकार सुरू असल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
२०१९ च्या सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार, अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्यास त्याचे गंभीर परिणाम पालकांना भोगावे लागतात.कलम १९९ (अ): जर अल्पवयीन मुलाने वाहन चालवताना गुन्हा केला, तर त्याचे पालक किंवा वाहनाचा मालक दोषी मानला जातो.पालकांना ३ वर्षांपर्यंत कारावास आणि २५,००० रुपये दंड होऊ शकतो. संबंधित वाहनाची नोंदणी १२ महिन्यांसाठी रद्द केली जाऊ शकते.गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत 'ड्रायव्हिंग लायसन्स' दिले जात नाही.रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून केवळ जनजागृती न करता, पोलिसांनी आता प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उलावावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
"अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे त्यांच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. जर पालकच मुलांना दुजोरा देत असतील, तर पोलिसांनी थेट पालकांवर गुन्हे दाखल करावेत,"
अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
आता या वाढत्या अपघातांच्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिंदखेड राजा पोलीस प्रशासन अशा 'बेजबाबदार' पालकांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment