त्रिकाळ पटलावरील अमृतकवी जगद्गुरू तुकोबाराय!


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील कळकेकर) :- जन्मला तो मरणार आहे. या दोन्हीच्या मधल्या अंतरासाठी जो तो अहोरात्र आपापले प्रयत्न करतोय. ज्याचा त्याचा अट्टहास वेगवेगळ्या गोष्टींसाठी अखंड सुरु आहे आणि तो असलाही पाहिजे. कुणाला काय व्हायचे आहे तर कुणाला काय. परवाला एका उच्चशिक्षित, श्रीमंत गृहस्थाने मला, “निर्विकार, निर्विचार मन करण्यासाठी, शांत झोप येण्यासाठी नेमकं काय करावं?” हा प्रश्न विचारला. प्रश्न मोठा चिंतनीय होता. एक माणूस म्हणून मी या प्रश्नावर चिंतन-मंथन करणे मला गरजेचे वाटले आणि त्यातच माझ्या सर्वकाळ संगतीला असणारे महापुरुष आणि जगद्गुरू तुकोबाराय मला मार्गदर्शक असल्याचा मनोमन आनंद झाला. सुदैवाने आज जगद्गुरू तुकोबाराय यांच्या बिजोत्सव (निर्वाण) निमित्ताने महाराष्ट्रात आणि जगभर सर्वत्र तुकोबांच्या अभंग-जीवनाचे चिंतन मंथन, त्यांच्या अभंगांवर कीर्तन-प्रवचने सुरु आहेत याचा मनस्वी आनंद आहे. तुकोबांच्या दृष्टीने सुरु असणाऱ्या या सर्जनशील ज्ञानयज्ञात सामील होत त्या महामानवाचे अभंगजीवन कर्तृत्वाचे चिंतन मंथन हेतूने हा शब्द प्रपंच!

तुकोबांना जाऊन तब्बल ३७५ वर्षे झाले तरीही तुकोबा आपल्या जवळच आहेत. अजीवन प्रचंड संघर्ष, प्रतारणा, अवहेलना, अनंत अडचणींचा सामना करावा लागला, तो माणूस आज आपला वाटाड्या आहे. अलीकडे स्वतःला ज्ञानी, वारकरी म्हणवून घेणारे लोक तुकोबांच्या गाथ्याला स्वतंत्र ग्रंथ नाही असे म्हणतांना समाजात अजूनही मंबाजी-रामेश्वर भट्ट असल्याचे दाखवून देतात. असो, त्यांना प्रतिक्रिया न देता आपल्या मार्गाने चालत राहणारे जगद्गुरू तुकोबाराय वाटाड्या होऊन शांतपणे हाताला धरून पुढे घेऊन जातांना “बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी । कोणी कैशी कैशी भावनेच्या॥ आणि “विचार करीता वाया जाय काळ । लटिके ते मूळ फजितीचे॥” असे बोलून संगतीला असतात. असं सहज काव्य लिहिणारे तुकोबाराय आपल्याला विनामुल्य उपलब्ध आहेत. तुकोबांची विचारसंपत्ती आणि चिंतन हे आजही संसारात नित्य पथदर्शी आहे. तुकोबांचा गाथा एक स्वतंत्र विचारग्रंथ असून संसारिक-पारमार्थिकांना नित्य, नवा आनंद, शांती, प्रेम, करुणा, जिव्हाळा, स्थैर्य, स्वतंत्र मार्ग दाखवणारा जीवनवेद आहे. तुकोबा सर्वमान्य लोकसंत आहेत. 

तुकोबांचा काळ किती खडतर आणि आजही काळ तेव्हढाच आव्हानात्मक आहे. मराठी भाषा दिनाच्या अनुषंगाने मला मराठी भाषेसंदर्भाने मात्र एक प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे जो पर्यंत महाराष्ट्रातील गावाच्या पारावरील एकादशीचे भजन बंद होणार नाही तोपर्यंत मराठी संपणार नाही. ‘रूप पाहता लोचनी’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘आता विश्वात्मके देवे’ आणि ‘घालीन लोटांगण’ अखंड सुरु आहे तोपर्यंत माझी माय मराठी सामान्यांच्या धमन्यातून नित्य प्रवाही आहे. त्यात लोकोबा लोकांशी संवादी होत असतात. होय, तुकोबा म्हणजेच लोकोबा! सर्वच आधुनिक कवींचा खापर खापर पणजोबा म्हणजे महाकवी तुकाराम! 

तुकाराम आपल्यासारखे भरल्यापोटी अलिशान घरात बसून काव्य करणारे नव्हेत. तिळमात्र अनुभव नसतांना, कोणतीही कृती न करता हजारो रुपये घेऊन, लोकांना गोड गोड बोलून, संसारातले बाष्कळ हाहा हुहू विनोद सांगून, दोन तासांपैकी एकच तास, पन्नास लाखाच्या गाडीत फिरून कीर्तन करणारे पाकीटमार बुवा नव्हेत. तुकोबांचा “ऐका वचन हे संत” अभंग वाचल्यानंतर तुकोबांची खडतर साधना दृगोचर होते. “तोंड न दाखवे जना । शिरे सांदी भरे राणा ॥ एकांत तो जाणा । त्यासाठी लागला ॥” हे शब्द वाचल्यानंतर तुकोबांच्या अभंग निर्मितीची आणि एकूणच त्यांच्या जीवन चिंतनाची पातळी लक्षात येते. तुकोबांनी आपला भोवताल जागृत केला. तुकोबांचे निर्वाण वयाच्या ४२ व्या वर्षी झाले म्हणजे तुकोबांची कविता ही ऐन तारुण्यातील अनुभवाविष्कार असून त्या कवितेचा अनुबंध थेट पुर्वासुरीच्या बौद्ध, जैन, महानुभाव, लिंगायत आणि वारकरी वाङ्मयाशी जुळतो. वरील वाङ्मयातील सर्वच धुरिणांनी समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून मानवी समाजाचे चित्रण रेखाटतांना इथल्या तथाकथित कर्मकांडी, भोंदू, देवाच्या नावाखाली सामान्य बायाबापड्यांना आर्थिक आणि शारीरिक स्तरावर लुटणाऱ्या थोतांड धर्माचा आणि धर्ममार्तंडांचा अनुभव आला होता, परिणामी त्यांनी माणूस, शोध-बोध, भूतदया, समता-स्वातंत्र्य, प्रेम, जिव्हाळ्याचा धर्मविचार मांडला आणि तोच सखोल प्रभाव तुकोबांच्या अभंगात प्रवाही झाला. याचा परिपाक म्हणजे तुकोबांनाही सर्वश्री चक्रधर, बसवन्ना, नामदेव, ज्ञानदेव, चोखोबा, गोरोबा, एकनाथ यांच्याप्रमाणे प्रचंड छळाला आणि मरणाला सामोरे जावे लागले. 

 तुकोबांची कविता जीवन-मरणाला भिडणारी कविता आहे. तुकोबा सामान्य संसारातील असामान्य बाबींना कवडीमोल महत्व देतांना माणसाच्या जीवनाचे, क्षणाक्षणाचे सार्थक करण्याचे ओळीओळीत सांगतात. त्यासाठी तुकोबांच्या अजरामर   

अमृताची फळें अमृताची वेली । ते चि पुढे चाली बीजाची ही ॥१॥

ऐसियांचा संग देई नारायणा । वोलाचा वचना जयांचिया ॥धृ॥

उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्ट कांती तैसी दिसे वरी ॥२॥

तुका म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥

अभंगांवर संसारिक आणि पारमार्थिक लोकांनी चिंतन करणे अपेक्षित आहे. असा विचार येणे आणि त्यातून वाचकांना जीवन बोध होणे हेच कवी-लेखकाचे उद्दिष्ट असते. तुकोबा त्याबाबतीत इथेही कळस ठरतात. तुकोबांचा प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र विचार ग्रंथ असून यावर अनेक विवेचनात्मक ग्रंथ झाले आहेत आणि यापुढेही होतील. हा अभंग दक्षिणेतील महान प्राचीन लेखक थिरुवल्लूवर यांच्या थिरूकुरल तमिळ ग्रंथातील मैत्री आणि संगती कवितेशी जुळतो. आत्तापर्यंत कुणीही अमृत पहिले नसले तरी आपल्या शब्द आणि कर्माने माणूस अजरामर होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय काव्य! संगतीचा परिणाम सर्वांच्या जीवनात नित्य पहायला मिळतो. उत्तम अन्न-पाणी घेतल्यास जसे गळ्याला त्रासदायक नसते त्याच न्यायाने ते अन्नोदक घेणाराची कांती-यष्टी सुदृढ करते. तसा संग माणसाला अंतर्बाह्य फुलवून टाकतो. अशा अनंत शब्दातून तुकोबाराय आपले अमृततत्व मागे ठेवतात. 

 लेखन-चिंतन किती सहज असते ते, ”साखरेचे नाम घेता कळे गोडी” सारखे सहज दृष्टांत-सिद्धांत पटवून संसारिक-पारमार्थिक माणसाला जगणे शिकवणारे तुकोबाराय सर्वांकरिता नित्य सांगाती आहेत. तुकोबांचा “असाध्य तें साध्य करितां सायास” अभंग तर सर्वकाळ सर्वांसाठी वाटाड्या आहे. अणुरेणुहून लहान आणि आकाशतत्व व्यापणारे, बुद्धाच्या ‘अत:दीप:भव:’ तत्वज्ञानाने त्रिपुटी सांडून घटापटाचा दिवा जनमानसात उजळवणारे तुकोबाराय एकवेळ केवळ आणि केवळ परोपकारासाठीच लिहितात. सर्वकाळ सर्वांना सर्वमार्गाचे मार्गदर्शन करणारे तुकोबाराय आपण आपले सोबती करणे काळाची गरज आहे. तुकोबांचा गाथा कुणी प्रमाण ग्रंथ म्हणो अथवा न म्हणो; आमच्यासाठी नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम आणि कबीर हे नित्य अनुभूतीसंपन्न, पथदर्शी संत असून संपूर्ण वारकरी संत प्रभावळ वंदनीय आहे. वारकरी वाङ्मय हे खडतर अनुभव, कडेकोट वर्णव्यवस्था आणि काळाच्या तडाख्यातून तावून सुलाखून निघालेले शंभर नंबरी सोने आहे! तेंव्हा चला मित्रहो, काळ कितीही खडतर असला तरी आपण आपला वारकरी धर्म न सोडता “कोण्याही जीवाचा न घडो मत्सर” हे वर्म हृदयांत ठेवून अखंड मानवतेची, सर्जनशीलतेची, समतेची, स्वातंत्र्याची भलावण करत राहतांना वारकरी संतांचा हा वैश्विक विचार नित्य नित्य पेरत राहूया! जय तुकोबाराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये 

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ 

जि.परभणी 

मो.9158064068 

(लेखक कवी, व्याख्याता, प्रबोधनकार, योगप्रशिक्षक आहेत.) 

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments