दुसरा शेतकरी गंभीर; मान्सूनपूर्व पावसातील दुर्दैवी घटना
लोकनेता न्युज नेटवर्कराहेरी बु. | ज्ञानेश्वर तिकटे :- तालुक्यात सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसादरम्यान राहेरी बुद्रुक येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दि २५ मे रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास दुसरबीड रोडवरील हॉटेल राजमाता परिसरात घडली.
लक्ष्मीकांत भगवानराव देशमुख (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून बलराम रामलाल मगर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी सायंकाळपासून परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. रात्री शेतातील काम आटोपून लक्ष्मीकांत देशमुख व बलराम मगर हे मोटारसायकलवरून गावाकडे परतत होते. बलराम मगर हे दुचाकी चालवत होते, तर देशमुख मागे बसले होते. गावापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असताना अचानक प्रचंड कडकडाटासह वीज थेट दुचाकीवर कोसळली. त्यामुळे दोघेही रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.
घटनेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी दोघांना खासगी वाहनातून सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर लक्ष्मीकांत देशमुख यांना मृत घोषित केले. बलराम मगर यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले.
प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार, देशमुख यांच्या डोक्यावर व छातीवर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मगर यांच्या शरीराचा सुमारे ८० टक्के भाग भाजला आहे.
मृत लक्ष्मीकांत देशमुख हे प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी राहेरी बुद्रुक येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर महसूल प्रशासनाने पंचनामा प्रक्रिया सुरू केली असून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मृताच्या कुटुंबाला सानुग्रह मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
________________________
Post a Comment