धाराशिव पोलीस मुख्यालयात 'पोलीस स्मृतीदिन' भावपूर्ण वातावरणात साजरा : 154 हुतात्मा जवानांना मानवंदना,,



लोकनेता न्यूज नेटवर्क

लोहारा/असलम खानापुरे :- कर्तव्यावर असताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर हुतात्मा पोलीस जवानांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस मुख्यालय, धाराशिव येथे 'पोलीस स्मृतिदिन' अत्यंत भावूक, शिस्तबद्ध आणि गंभीर वातावरणात साजरा करण्यात आला.

हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून सलामी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक मा. श्रीमती रितू खोखर मॅडम, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ (प्रभारी पोलीस उप-अधीक्षक, गृह) व सहाय्यक पोलीस निरीक्षक नमिता देशमुख (EOW) यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी RSI काटे आणि मुख्यालय तुकडीच्या पथकाने हवेत तीन ब्लँक राऊंड फायर करून व शोकशस्त्र स्थितीत मान झुकवून वीर हुतात्म्यांना मानवंदना (सलामी) दिली. यावेळी संपूर्ण पोलीस मुख्यालय परिसरात शोकाकूल शांतता पसरली होती.

'हे बलिदान कधीही विसरता येणार नाही' - पोलीस अधीक्षक रितू खोखर

या प्रसंगी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी 'हुतात्मा दिनाचे' महत्त्व उपस्थितांना विशद केले. त्या म्हणाल्या,


"21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील 18,000 फूट उंचीवरील हॉटस्प्रिंग येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 10 जवानांनी चिनी सैनिकांच्या अचानक झालेल्या हल्ल्याला अपुऱ्या शस्त्रांनिशी अत्यंत धैर्याने प्रतिकार करत वीरमरण पत्करले होते. त्यांच्या या असीम शौर्याची आणि बलिदानाची आठवण म्हणून संपूर्ण देशभर हा दिवस 'पोलीस स्मृतिदिन' म्हणून पाळला जातो."


पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात (1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026) या कालावधीत देशभरात कर्तव्य बजावताना 154 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी, कायदा व सुव्यवस्था राखताना आणि जनतेच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाला देखील आपण कधीही विसरू शकत नाही.

या हुतात्म्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास पोलीस मुख्यालयातील सर्व अधिकारी, अंमलदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी हुतात्म्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. ________________________

0/Post a Comment/Comments