ग्रामसभा न घेतल्याचा दावा; दुसऱ्या गावातील छायाचित्रे जोडल्याच्या तक्रारीनंतर आमरण उपोषण सुरू
लोकनेता न्युज नेटवर्क
जिंतूर :- जिंतूर तालुक्यातील कोठा (बेलूरा) ग्रामपंचायती अंतर्गत मागील पाच वर्षांत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा दर्जा, प्रत्यक्ष कामाचे प्रमाण आणि त्यासाठी झालेल्या खर्चाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ मारोती गणपत चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. तक्रारीवर अपेक्षित कार्यवाही न झाल्याचा दावा करत चव्हाण यांनी २ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. निवेदनानुसार, ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या विकासकामांची मंजूर अंदाजपत्रके, आराखडे आणि तांत्रिक निकषांनुसार अंमलबजावणी झाली आहे का, कामाचे प्रत्यक्ष प्रमाण आणि खर्चाच्या नोंदी यामध्ये तफावत आहे का, याची अधिकृत यंत्रणेमार्फत तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अभिलेखांशी पडताळणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ग्रामसभा प्रक्रियेबाबतही निवेदनात गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. गावात नियमानुसार ग्रामसभा झालेली नसतानाही ग्रामसभा झाल्याचे दाखविण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला असून, त्यासाठी दुसऱ्या गावातील ग्रामसभेची छायाचित्रे जोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पाच वर्षांतील ग्रामसभा इतिवृत्त, उपस्थिती नोंदवही, ठराव पुस्तिका, छायाचित्रे आणि इतर अधिकृत अभिलेखांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली असून ग्रामसभा प्रत्यक्षात झाली होती की नाही, याची स्वतंत्रपणे खातरजमा करून त्याबाबतचा चौकशी अहवाल सादर करावा, असेही निवेदनात नमूद आहे. दरम्यान कार्यवाही न झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. विकासकामांचा दर्जा, निधीचा वापर आणि ग्रामसभा प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच आरोपांमधील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन कोणती कार्यवाही करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
________________________

Post a Comment