लोकनेता न्यूज नेटवर्क
हदगाव|कृष्णा गिरामकर : हदगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अलीकडच्या काळात चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहरातील काही दुकाने व व्यावसायिक आस्थापनांमध्ये चोरीच्या घटना घडल्यानंतर आता ग्रामीण भागातील चोरीची घटनाही समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी हदगाव शहरातील एसबीआय बँकेसमोरील तसेच परिसरातील काही दुकाने फोडून चोरी झाल्याची घटना घडली होती. याशिवाय बिअर बार, मेडिकल स्टोअर आणि दारूच्या दुकानातही चोरी झाल्याचे समोर आले आहे. या घटनांचा तपास सुरू असतानाच शहरातील कमलाई नगर परिसरात काही घरांच्या परिसरात संशयित व्यक्तींच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या फुटेजमध्ये काही व्यक्तींच्या हातात शस्त्रासारखी वस्तू दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
या सलग घटनांमुळे हदगाव शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हरडफ येथे साडेसात तोळे सोन्याची चोरी दरम्यान, हदगाव तालुक्यातील हरडफ येथे संजय उत्तमराव वारकड यांच्या राहत्या घरातून जवळपास साडेसात तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
वारकड यांच्या माहितीनुसार, घरात डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने डब्यासह चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी हदगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड येथील श्वान पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाटील यांच्या देखरेखीखाली श्वान पथकाने घटनास्थळाची तपासणी केली.
या चोरीप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत असून, चोरीला गेलेल्या दागिन्यांची नेमकी किंमत आणि चोरी करणाऱ्या व्यक्तींबाबत तपासातून माहिती समोर येणार आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्री नाकाबंदी हदगाव शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हदगाव पोलीस ठाण्याने रात्रीची गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
“आजपासून माझ्यासह ५० टक्के पोलीस स्टाफ रस्त्यावर उतरून गस्तीचे काम करणार असून, रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात येणार आहे,” अशी माहिती हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली.
या कालावधीत शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार असून संशयास्पद व्यक्ती व वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनीही रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in

Post a Comment