लोकनेता न्युज नेटवर्क
पंढरपूर :- आराध्य दैवताला नमन तथा संत आणि महापुरुषांना अभिवादन करून या सातव्या राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाच्या सुरूवातीलाच उपस्थित सर्व रसिक, साहित्यिक तथा मान्यवरांना नमस्कार करून दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो. तसा साहित्य आणि लेखन हा माझा आवडता छंद आणि सोबतच वाचन सुद्धा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याचबरोबर माझे हेही नम्र निवेदन आहे की, प्रत्येकाने जीवनात वाचन आणि विचारासोबत विवेक यांना आपल्या जीवनाचे अंग बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी सुरुवातीपासून सातत्याने मी प्रयत्नशील असल्याचे मला एक समाधान आहे. आजच्या या संमेलनाच्या निमित्ताने हे सांगणे कर्तव्य ठरते की, सर्व सुखी राहोत, निरोगी राहोत आणि सर्वांचे कल्याण होवो, कुणी दु:खी न राहो, ही कामना नमूद करणे आवश्यक यासाठी आहे की, हे सर्व साध्य करण्यासाठी मानवी जीवनात आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतीय माणसाच्या जीवनात मानवीय विचारांची जी पेरणी, भगवान गौतम बुद्ध तसेच संतांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे इ. सारख्या बहुतांश सर्व महापुरूषांनी, केलेली आहे त्या विचारांची जोपासना होणे आणि ती ही आजच्या व भविष्यातील पिढीसाठी प्रकर्षाने होणे ही काळाची गरज आहे असे मला वाटते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापून जनकल्याणाचे राज्य उभारले, स्त्रीदाक्षिण्याचा महान विचार मांडला, महात्मा फुले यांनी व सावित्रीबाईंनी हजारो वर्षांच्या सामाजिक गुलामीवर आघात करून महिला, विधवा, शुद्र व दीन दुबळे यांच्यासाठी वैचारिक क्रांतीची एक वेगळी मशाल पेटवली, तसेच शाहु महाराजांनी आपल्या राज्यातील एकूण एक जनतेच्या व तळागाळातील गोरगरीबांच्या कल्याणाच्या कित्येक योजनासह आरक्षणाची ऐतिहासिक आणि नवी संकल्पना मांडून आगळा वेगळा इतिहास घडविला, गाडगेबाबांनी अंधश्रद्धा व अज्ञान यावर जन्मभर प्रहार करून लोकमानस जागृतीचा संदेश दिला, स्वच्छतेचे महत्व सांगीतले, अण्णाभाऊंनी सामाजिक प्रबोधन व स्वकल्याणाचा विचार आपल्या लिखाणातून प्रत्येकासाठी मांडला, आणि महत्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवीय विचारांची सांगड घालून या महाखंडासमान भारत वर्षाच्या जनतेसाठी, त्यांच्या कल्याण व विकासासाठी आणि स्वतंत्र भारताचे नाव विश्वविख्यात होण्यासाठी मानवीय विचारांचे संविधान आपल्याला बहाल केले, या सर्वांच्या विचारांचा धागा घेवून, बहुजन साहित्य संघ, चिखली ची, ॲड. विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली, गेल्या अनेक वर्षापासून जी निरंतर व यशस्वी वाटचाल सुरू आहे, त्या त्यांच्या परिवर्तनाच्या व सामाजिक, अभिसरण आणि बहुजनांचे मानवाधिकार संवर्धन व संरक्षणाच्या चळवळीमध्ये, या संतनगरी पंढरपूर येथील सातव्या राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची धुरा माझ्या खांद्यावर आली त्याबद्दल मला जो आनंद आणि समाधान वाटले ते शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. आणि माझ्या पर्यंत हे सर्व आणुन पोहचविण्याचे सारे श्रेय पंढरपूरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्या सामाजिक व साहित्यिक योगदानामुळे अभिमानास्पद ठरलेले आणि हजारो शब्दांचे नांव एका पुस्तकाला देऊन गिनीज बुकमध्ये आपले, आपल्या गावाचे, महाराष्ट्राचे व देशाचेही नांव कोरून दिव्य ऐतिहासिक विक्रम करणारे स्वयंसिद्ध साहित्यिक व प्रकाशक असे माझे मित्र रवि सोनार यांच्याकडे जाते.
तसेच या निमित्ताने साहित्यिक, लेखक, कथाकार, कवि, कलावंत व इतरही विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उदा. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा ज्येष्ठ व परखड कवयित्री मा. आशा खडतरे डांगे, छ. संभाजीनगर, उदघाटक तथा राजकारणाच्याच नव्हें तर सामाजिक चळवळ व साहित्यिक क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करणारे माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रमुख अतिथी सामाजिक व धडाडीचे कार्यकर्ते मा. आमदार प्रशांतजी परिचारक, पंढरपूर , प्रमुख पाहुणे तथा तळागाळातील आदिवासींच्या विकासासाठी हयातभर झटणारे व शिक्षणाची पताका फडकवणारे तडफदार नेते मा. किसनराव कुऱ्हाडे, गडहिंग्लज, परकायाप्रवेशी कथाकथनासाठी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजीनगर, विचारवंत डॉ. टकले, प्रा. एम्. ए. गायकवाड, प्रा. भारत कृष्णा गायकवाड इ. सारख्या विद्वत्जनांच्या सान्निध्यात बसण्याची व विचारांचे आदानप्रदान करण्याची अविस्मरणीय संधी मिळाली हाही माझ्यासाठी दुर्लभ योग आहे.
त्या संधीचा फायदा घेऊन मला आज या संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व लिहित्या मंडळींना हे सांगायचे आहे की देशाची व त्यातील जनतेची, किसानांची, शेतीची, मजूरांची, विद्यार्थ्यांची, त्यांच्या सरकारी शाळांची, सुशिक्षित बेरोजगारांची, महिलांची, वृत्तसंस्थांची आणि एकूणच देशाच्या संविधानाची व लोकशाहीची काय गत आहे याचा गांभीर्याने अभ्यास करण्याची जबाबदारी आता शासनकर्त्यांवर नसून तुमच्यावर आहे हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल आणि त्याच्यावर काय इलाज किंवा उपाय आहे यावरही विचार तुम्हालाच करावा लागणार असून कुणालाही व कशालाही न दबता न भिता तुमच्या लेखणीने या अवस्थेच्या विरूद्ध आवाज उठविला पाहिजे. तुमची कविता, तुमची कथा, कादंबरी, लेख साऱ्या साऱ्या मधून जनजागरणाची दुंदूभी फुंकून उद्याचा नवा विकसित भारत घडवायचा आहे, माणसाला माणूस म्हणून ओळखण्याचा व तसे वागविण्याचा संदेश रयतेला द्यायचा आहे.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील जनकल्याण, महिलांच्या सुरक्षेचे आश्वस्त विधान, फुल्यांची क्रांती, शाहू राजांची जनोध्दार निती, गाडगे बाबांचे बौध्दीक परिवर्तन आणि बाबासाहेबांचे शुध्द मानवीय विचारांचे व लोकांनी, लोकांसाठी व लोकांचे बनविलेले सरकार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रबोधनाचे हे धनुष्य आता तुम्हालाच पेलायचे आहे, हे तुम्ही तुमच्या काळजावर गोंदून घेऊन जगाच्या नकाशावर आपल्या भारत देशाचे नांव सुवर्णाक्षरांनी कोरायचे आहे.
मजहब हमे नही सिखाता आपसमे बैर रखना
सुनलो मेरे भाई सुनलो मेरी बहेना !!
क्या हिंदू क्या मुस्लिम
क्या है सिख ईसाई
भारत सबका देश है
सबने भाई बनके रहेना !!
हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा ही माझी आंतरिक इच्छा आहे.
आणि म्हणून बहुजन साहित्य संमेलनाच्या या सोहळ्याला संविधान ग्रंथाच्या दिंडीने झालेली सुरुवात एका वैचारिक क्रांतीची नांदी ठरेल अशी मला खात्री आहे.
या परिवर्तनाच्या प्रबोधन यात्रेकरूंचा हा मेळा पंढरपूर सारख्या वैचारिक अधिष्ठान असलेल्या संतनगरीत व्हावा हे ही बहुतेक विधीलिखितच असावे असे मला वाटते.
यापेक्षा जास्त मी काही सांगणे योग्य नाही.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्यासारख्या सामान्य माणसाला बसवून जो सन्मान मला दिला त्यासाठी पुनश्च एकदा हार्दिक धन्यवाद देतो.
- नागेश सिंघन, पंढरपूर
दि. २३-०८-२०२६
________________________

.jpeg)


Post a Comment