समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू!

शेतात फवारणी करताना पेट्रोल संपले; पेट्रोल पंपाकडे जात असताना चॅनल क्रमांक ३१० वर अपघात

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा | सुरेश हुसे :- समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत ६८ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी सुमारे २.१५ वाजता घडली. चॅनल क्रमांक ३१०, नागपूर कॉरिडॉरवर हा अपघात झाला. श्रीराम पांडुरंग कुटे (वय ६८, रा. झोटिंगा, ता. सिंदखेडराजा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

          मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम कुटे हे रविवारी दुपारी आपल्या शेतात फवारणीचे काम करीत होते. फवारणीसाठी आवश्यक पेट्रोल संपल्याने ते पेट्रोल घेण्यासाठी समृद्धी महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाकडे निघाले. पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी त्यांना समृद्धी महामार्ग ओलांडावा लागत होता.

            चॅनल क्रमांक ३१०, नागपूर कॉरिडॉरवरून महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने कुटे यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता एवढी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

            घटनेची माहिती मिळताच बीबी पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह पुढील कार्यवाही व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, लोणार येथे पाठविण्यात आला.

              या घटनेबाबत मृताचे पुत्र मारुती श्रीराम कुटे यांनी पोलिसांना माहिती दिली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांची तत्परता

        अपघाताची माहिती मिळताच एपीआय राहुल पाटील, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पायघन, पोलिस कॉन्स्टेबल इरफान शेख, आकाश यादव, राहुल कायंदे तसेच मलकापूर येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी आवश्यक ती खबरदारी घेत बॅरिकेडिंग केली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

महामार्ग ओलांडताना खबरदारीची गरज

           समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग अधिक असल्याने पादचाऱ्यांनी अथवा शेतकऱ्यांनी महामार्ग ओलांडताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी शक्यतो अधिकृत मार्ग, अंडरपास किंवा उपलब्ध सुरक्षित क्रॉसिंगचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महामार्गालगतच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

________________________

0/Post a Comment/Comments