खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी नियोजनावर शेतकऱ्यांचा संतप्त सवाल; इसरूळ चिंचखेड-मंडपगाव शिवारात अधिकाऱ्यांना जाब, संतोष भुतेकर यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांची रेती उपशाच्या बोटींच्या परवानग्या तपासण्याची मागणी
लोकनेता न्युज नेटवर्क
चिखली/प्रतिनिधी :- जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कारवाई केली जात असताना खडकपूर्णा प्रकल्पातील रेती उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींच्या परवानग्यांचीही तपासणी करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. इसरूळ फीडरअंतर्गत चिंचखेड आणि मंडपगाव शिवारात कृषिपंपांवरील कारवाईसाठी आलेल्या संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारत पाणी नियोजनाचे निकष स्पष्ट करण्याची मागणी केली.
खडकपूर्णा प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना आजही शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. खरीप हंगामातील पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना पिकांना पाणी देण्यास अडथळे निर्माण झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुष्काळसदृश परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक असले, तरी उपलब्ध पाणीसाठा, शेतीची गरज आणि पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने समतोल नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या कृषिपंपांबाबत नियमांची अंमलबजावणी केली जात असेल, तर खडकपूर्णा प्रकल्पातील रेती उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींच्या परवानग्यांचीही तपासणी करण्यात यावी, असा मुद्दा संतोष पाटील भुतेकर यांनी उपस्थित केला. संबंधित बोटींच्या परवानग्या वैध आहेत का, आतापर्यंत किती ब्रास रेतीचा उपसा झाला आणि उत्खननासाठी निश्चित केलेल्या अटींचे पालन केले जात आहे का, याची अधिकृत माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. परवानग्यांची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चार दिवसांपूर्वी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण आणि खडकपूर्णा प्रकल्पाचे अधिकारी शेतशिवारात आले होते. त्यावेळीही शेतकऱ्यांनी रेती उपशाच्या बोटींबाबत प्रशासनाची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पुन्हा इसरूळ फीडरअंतर्गत चिंचखेड आणि मंडपगाव शिवारात खडकपूर्णा प्रकल्प, महावितरण आणि महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाल्याने शेतकरी घटनास्थळी जमा झाले. दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्पष्ट उत्तरे द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, मंडपगावचे सरपंच सचिन कदम, रविराज देशमुख, दीपक राव पुंगळे, विष्णू भुतेकर, भास्कर भुतेकर, रामेश्वर वायाळ, अशोक भुतेकर, गजानन देशमुख, वाल्मीक देशमुख, गजानन भुतेकर, दत्तात्रय भुतेकर, विठ्ठल भुतेकर,गोपाल भुतेकर निवृत्त पोलीस अधिकारी काकडे साहेब, फकीर सेट आणि कैलास बकाल यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत कृषिपंपांवरील कारवाईचे निकष, पाणी वापराचे नियोजन आणि रेती उपशाच्या बोटींच्या परवानग्यांबाबत स्पष्टता देण्याची मागणी केली. या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शेतीपिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करणेही आवश्यक आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याची वस्तुस्थिती, पिण्याच्या पाण्याची गरज, सिंचनावरील निर्बंध आणि प्रकल्पातील रेती उपशाच्या बोटींची वैधता या सर्व बाबींची निष्पक्ष तपासणी करून प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
याप्रकरणी संतोष पाटील भुतेकर यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला प्रश्न विचारले. कृषिपंपांवरील कारवाईबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, रेती उपशाच्या बोटींच्या परवानग्यांची तपासणी करावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
“खडकपूर्णा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. पिकांना पाण्याची गरज असताना कृषिपंपांवरील कारवाईबाबत स्पष्टता मिळाली पाहिजे. पाणी नियोजनाचे नियम सर्वांसाठी समान असावेत. कृषिपंपांबाबत कारवाई करताना रेती उपशाच्या बोटींच्या परवानग्यांचीही तपासणी करून प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढावा,” अशी भूमिका युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी मांडली.
खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी नियोजन, कृषिपंपांवरील निर्बंध आणि रेती उपशाच्या बोटींच्या परवानग्यांबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
________________________

Post a Comment