न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या हस्ते कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी नियुक्त

लोकनेता न्यूज नेटवर्क 

भगवानगड (प्रतिनिधी) :- १९५१ साली दसऱ्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक अध्यक्ष, ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी श्री क्षेत्र भगवानगडाची स्थापना केली. आज या गडाला स्थापन होऊन ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने भगवान गडाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यावर्षी सर्वांत महत्वाचा दुग्धशर्करा योग म्हणजे आजच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाला स्थापन होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि आजच्याच दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाच्या चतुर्थ मठाधिपतींची नियुक्ती झाली आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी आपले उत्तराधिकारी व श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ महंत म्हणून ह.भ.प.श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली होती. शास्त्रीजींनी साधारण दोन वर्षांपूर्वी ही अधिकृत घोषणा केली होती. ह.भ.प.श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांनी बारा वर्षे श्री क्षेत्र भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये राहून महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी व इतर धार्मिक ग्रंथांचे अध्ययन केलेले आहे. विद्या पारंगत झाल्यानंतर श्रीगुरु शास्त्रीजींनी त्यांना एकनाथवाडी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव तेथील निरंजन संस्थानचे महंत केले होते. जवळपास तीन वर्ष ह.भ.प. श्री कृष्णा महाराज शास्त्रीजींनी निरंजन संस्थानचे महंत म्हणून काम पाहिलेले आहे. श्रीगुरु शास्त्री बाबांनी त्यांची श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत म्हणून घोषणा केल्यानंतर साधारण दोन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथून ग्रामस्थांनी ह.भ.प.श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांना रथामध्ये बसवून ढोल, ताशा, टाळ, मृदंगाचा गजर आणि हरी नामाचा जयघोष करत श्री क्षेत्र भगवानगडावर आणून पोहोच केले होते. श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांना एकनाथवाडीतून निरोप देताना लहान थोरांसह संपूर्ण ग्रामस्थ ढसाधासा रडले होते. श्रो.कृष्णा ‌‌महाराज शास्त्री हे मूळचे तेलंगणातील असून १७ वर्षांपूर्वी भगवानगडावर आले होते. त्यांचे एमए पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. यावर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांना श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ महंत म्हणून गादीवर बसवण्याचा निर्णय विद्यमान मठाधिपती, ह.भ.प. न्यायाचार्य डॉ.श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा व श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टने घेतला होता. हा सोहळा खूप भव्य दिव्य करण्याचे ठरवले होते. परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे हा सोहळा खूप भव्य दिव्य करण्याऐवजी छोटेखानी करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टने घेतला. कार्यक्रम छोटेखानी असला तरी हा सोहळा पाहण्यासाठी श्री क्षेत्र भगवानगडाचे हजारो भक्त दसऱ्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडावर हजर होते. श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान मठाधिपती ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा हे श्री क्षेत्र भगवानगडाच्या गादीवर चतुर्थ महंत नियुक्त केल्यानंतर सामाजिक जीवनातून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे इथून पुढे श्री क्षेत्र भगवानगडाच्या संपूर्ण भक्त मंडळींनी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती म्हणून ह.भ.प. महंत श्रीगुरु श्री.कृष्णा महाराज शास्त्री बाबा यांच्याशी संपर्कात राहावे. श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान महंत ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी स्वतः विधिवत पद्धतीने श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ महंत म्हणून ह.भ.प.कृष्णा महाराज शास्त्रीजींना भगवानगडाच्या गादीवर बसवले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान मठाधिपती ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी बाबा यांनी सामाजिक जीवनातून निवृत्ती घेतली असली तरी ते त्यांचे उर्वरित आयुष्य हे ज्ञानेश्वरीचा भावानुवाद लिहिण्यासाठी अर्पण करणार आहेत. ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी आयुष्यभर पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली आणि महंत शास्त्रीजी त्याच ज्ञानेश्वरीचा संपूर्ण भावानुवाद लिहीत आहेत ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इथून पाठीमागे शास्त्रीजींनी ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे ग्रंथ लिखाण केलेले आहे, इथून पुढेही आयुष्यभर त्यांचे लिखाण व ग्रंथनिर्मिती सुरूच राहणार आहे.

________________________

0/Post a Comment/Comments