लातूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीचे सहकार पॅनल सज्ज


   
लोकनेता न्यूज नेटवर्क 

 लातूर / जाफर पटेल :- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या पुढाकारातून महायुतीतील नेत्यांची मजबूत मोट बांधून सत्ताधारी काँग्रेसच्या विरुद्ध या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून महायुतीचे नेते सज्ज झाले आहेत. एकूणच लातूर जिल्हा बँकेची निवडणूक निर्णायक निकाल देणारी ठरणार आहे.
        लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अनुषंगाने भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांचा समन्वय साधून प्रयाग या आपल्या निवासस्थानी सोमवारी सायंकाळी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बँकेच्या निवडणूक अनुषंगाने सविस्तर चर्चा होऊन सत्ताधारी काँग्रेसच्या विरुद्ध ताकतीने महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार करण्यात आला.
       आ. कराड यांनी अचानकपणे तातडीने आयोजित केलेल्या या बैठकीस महायुतीचे नेते माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. बसवराज पाटील मुरूमकर, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रदेश भाजपाचे गणेशदादा हाके, अरविंद पाटील निलंगेकर, माजी आमदार त्रिंबक भिसे, दिलीप देशमुख, राजेश्वर निटुरे, भगवान पाटील तळेगावकर, ऋषिकेश कराड यांच्यासह महायुतीतील अनेकांची उपस्थिती होती. तर आ. अभिमन्यू पवार, माजी मंत्री विनायकराव पाटील आणि माजी आमदार दिनकरराव माने हे दूरध्वनी वरून बैठकीत सहभागी झाले होते.
        राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून महायुती पूर्ण ताकतीने उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. सहकार चळवळीला नवी दिशा देण्याचा संकल्प करण्यात आला. महायुतीच्या या बैठकीमुळे कार्यकर्त्यात स्फूर्ती देणारा संदेश निर्माण झाला आहे.________________________

0/Post a Comment/Comments