राज्य उत्पादन शुल्कचा लोहारा तालुक्यात अवैध दारू धंद्याला उघड अभय!

 


लोकनेता न्यूज नेटवर्क

लोहारा / असलम खानापुरे :- लोहारा शहर आणि तालुक्यात सध्या अवैध दारूचा महापूर आला असून या महापुराला राज्य उत्पादन शुल्क विभागानेच अभय दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. लोहारा आणि तालुक्यातील सर्व अवैध दारू विक्रेत्यांना जणू विभागाच्या अधिकाऱ्यांनीच वाऱ्यावर सोडले आहे की काय, अशी शंका आता जनतेतून व्यक्त होत आहे.

सर्व काही माहिती असूनही डोळेझाक का?

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यात कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळी, कोणती गाडी अवैध दारूचा माल घेऊन येते, त्या गाडीमध्ये किती माल असतो आणि तो माल नेमका कुणाचा आहे, याची इत्यंभूत माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. 

माहिती असूनही कारवाई मात्र शून्य आहे. मग हा केवळ योगायोग समजायचा की जाणीवपूर्वक केलेला नजरअंदाज? हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. 

तालुक्यातील गावोगावी, हॉटेल, ढाबा, पानटपरी आणि विशेष करून काही चायनीज सेंटरवर राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे. दिवसाढवळ्या दुचाकीवरून, चारचाकी गाड्यांमधून मालाची वाहतूक होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी गप्प कसे? हा जनतेचा सवाल आहे.

अधिकारी वाऱ्यावर सोडतात, तरुण पिढी व्यसनात!

विभागाच्या या निष्काळजीपणामुळे आणि अभयदानामुळे लोहारा तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. ग्रामीण भागात अवैध दारूमुळे कौटुंबिक हिंसाचार, भांडणे आणि गुन्हेगारी वाढली आहे. महिला वर्गात प्रचंड आक्रोश आहे, पण ऐकणारे कोणीच नाही.

जर उत्पादन शुल्क विभागाने वेळीच आपली जबाबदारी ओळखली नाही, तर येणाऱ्या काळात मोठा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.*मागणी स्पष्ट आहे*

1. लोहारा शहर व तालुक्यातील सर्व हॉटेल, चायनीज सेंटर आणि संशयित ठिकाणी तात्काळ धाडसत्र राबवावे.

2. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या गाड्यांची सखोल चौकशी करून मालकांवर गुन्हे दाखल करावेत.

3. या अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.

मा. जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक आणि मा. जिल्हाधिकारी साहेबांनी या गंभीर विषयाची स्वतःहून दखल घेऊन लोहारा तालुक्याला या अवैध दारूच्या विळख्यातून मुक्त करावे, अशी मागणी संपूर्ण लोहारा तालुक्यातील जनतेतून होत आहे.




लोहारा तालुका - स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट या पुढे कार्यवाही नाही झाली तर हॉटेल मालक व ठिकाण याची संपूर्ण यादी लोकनेता मधून मांडण्यात येईल


________________________

0/Post a Comment/Comments