लोकनेता न्युज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील चोखेवाडा. :- कोईनदुळ,गडदापल्ली,रेकणार,गुमडी आणि येडंमपल्ली या अत्यंत दुर्गम आदिवासी गावांना जोडणारा सलग डांबरी रस्ता तसेच आवश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम तातडीने मंजूर करावे, अशी आग्रही मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात एटापल्लीच्या तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही या गावांना कायमस्वरूपी पक्का रस्ता नसल्याने स्थानिकांना आजघडीला जंगलातील खडतर पायवाटांवरूनच ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांना व ओढ्यांना पूर आल्यास या सर्व गावांचा मुख्य प्रवाहाशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटतो. परिणामी रुग्ण, गरोदर महिला, विद्यार्थी आणि प्रवाशांना भीषण हाल सोसावे लागत आहेत. "या दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आणखी किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार?" असा संतप्त सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात केवळ खनिज संपत्ती असलेल्या भागांच्याच विकासावर चर्चा केंद्रित केली जाते, असा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार म्हणाले, “ज्या भागात खाणकाम नाही, तेथील मूलभूत सुविधांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार? विकास केवळ खाणी असलेल्या भागापुरता मर्यादित राहणार का? चोकेवाडा ते येडंमपल्ली मार्गावर रस्ता देणे हा शासनाचा उपकार नसून नागरिकांचा तो घटनात्मक हक्क आहे. प्रशासनाने आता कोरड्या आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.”
प्रशासनाने या संपूर्ण मार्गाचे तातडीने सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करावे, नदी-नाल्यांवर पक्के पूल मंजूर करावेत आणि आवश्यक निधी उपलब्ध करून प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. "जंगल पायवाट नव्हे, हक्काचा डांबरी रस्ता द्या!" ही भूमिका मांडत प्रशासनाने यावर कालबद्ध निर्णय न घेतल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार,जिल्हा सदस्य सुरज जककुलवार,रितेश जोई,तेजस गुज्जलवार,देवराम नरोटे,परशुराम नैताम, दशरथ पोटावी,मनकु मटामी यांच्यासह विविध गावांतील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________


Post a Comment