मोहखेड तांड्यानंतर कान्ह्यातही गांजाची लागवड उघड; दोन आठवड्यांत दोन ठिकाणी धाड
जिंतूर : रत्नदीप शेजावळे
:- तालुक्यात शेतीच्या आड गांजाची लागवड आढळून येण्याचे प्रकार सलग समोर येत असल्याने अमली पदार्थांच्या शेतीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मोहखेड तांड्यानंतर आता कान्हा शेतशिवारातही गांजाची शेती आढळून आली आहे. अवघ्या दोन आठवड्यांत दोन ठिकाणी गांजाची लागवड सापडल्याने तालुक्यात आणखी कुठे-कुठे अशा पद्धतीने लागवड केली जात आहे का, हा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कान्हा शिवारातील हळदीच्या पिकात लपवून गांजाची लागवड केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा आणि बामणी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला. मंगळवारी (६ ऑक्टोबर) रात्री सव्वा नऊच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून संतराम त्र्यंबक दुबळकर यांच्या ताब्यातील शेतातून गांजाची नऊ झाडे जप्त केली. या कारवाईत १६ किलो ४५५ ग्रॅम गांजा आणि ८ लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोहखेड तांडा आणि कान्हा दोन ठिकाणी लागवड उघडकीस आल्यानंतर आता ‘ही केवळ दोन शेतांची बाब आहे का?’ हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. तालुक्यातील इतर शेतशिवारांमध्येही अमली पदार्थांची लागवड होत नाही ना, याची व्यापक तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी संशयित ठिकाणांची माहिती घेऊन त्याची पडताळणी केल्यास या प्रकाराची व्याप्ती स्पष्ट होऊ शकते.
विशेष म्हणजे, गांजाची शेती एका रात्रीत उभी राहत नाही. लागवड, वाढ आणि उत्पादनासाठी कालावधी लागतो. त्यामुळे ही लागवड नेमकी केव्हापासून सुरू होती? संबंधितांना गांजाच्या लागवडीचे ज्ञान कुठून मिळाले? या पिकाची खरेदी-विक्री कोण करणार होते? यामागे आणखी कोणी आहे का? असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे केवळ शेतातील झाडे जप्त करून मिळणार नाहीत; त्यासाठी सखोल तपासाची गरज आहे.
तालुक्यातील गांजाच्या लागवडीचे प्रकार नव्याने समोर येत असतील तर अमली पदार्थांची लागवड रोखण्यासाठी केवळ कारवाईपुरता तपास न ठेवता त्याचा माग काढण्याची आवश्यकता आहे. संबंधित शेतांपर्यंत लागवडीचे बियाणे कसे पोहोचले, त्याचा संभाव्य पुरवठा आणि विक्रीची दिशा कोणती होती, याचाही तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कान्हा प्रकरणी सपोउपनि. नितीन वडकर यांच्या फिर्यादीवरून बामणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोउपनि. प्रबोधन जोंधळे करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि बामणी पोलिसांच्या या कारवाईनंतर आता जिंतूर तालुक्यातील गांजाच्या लागवडीचे मूळ शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे.
________________________

Post a Comment