बिस्लेरीवर खटल्यास मंजुरी; FSSAI ची कारवाई
फेरतपासणीतही नमुना ठरला असुरक्षित; बिस्लेरीसह पाच कंपन्यांवर खटला, अन्य दोन कंपन्यांचे परवाने निलंबित
नवी दिल्ली :- बाटलीवर शुद्धतेचा दावा, ब्रँडवर कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास आणि प्रत्येक घोटात सुरक्षिततेची अपेक्षा... पण याच विश्वासाच्या बाटलीतील पाणी तपासणीत असुरक्षित ठरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशभरात पिण्याच्या शुद्ध पाण्याचा विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या नमुन्याबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) गंभीर भूमिका घेत कंपनीविरुद्ध खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने प्राथमिक तपासणीच्या निष्कर्षाला आव्हान दिल्यानंतर करण्यात आलेल्या फेरतपासणीतही नमुना असुरक्षित ठरला. त्यामुळे आता बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
FSSAIने अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत बिस्लेरीसह पाच अन्न उत्पादक कंपन्यांवर खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली असून, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्य दोन कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बिस्लेरीच्या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीत निर्धारित ब्रोमेट मर्यादेशी संबंधित निकषांवर तो असुरक्षित आढळल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनीने अपील केल्याने नमुना संदर्भ अन्न प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. मात्र, तेथे झालेल्या फेरतपासणीतही पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याने नमुना पुन्हा असुरक्षित घोषित करण्यात आला. प्राथमिक तपासणीपासून संदर्भ प्रयोगशाळेच्या अहवालापर्यंत निष्कर्ष कायम राहिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या निष्कर्षांच्या आधारे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत खटल्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मसाल्यांपासून चॉकलेट कुकीजपर्यंत धक्कादायक निष्कर्ष
या कारवाईचा फटका केवळ बाटलीबंद पाण्याच्या उत्पादकांनाच बसलेला नाही, तर मसाले आणि खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेडच्या मिरची पावडरमध्ये अनुज्ञेय मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात डायफेनोकोनाझोल या कीटकनाशकाचे अवशेष आढळले. टिट बिट फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मिरची पावडरमध्येही कीटकनाशकांचे अवशेष, तर हळद पावडरमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कथील आढळल्याने कारवाई करण्यात आली. मीमांसा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अक्रोडाचे दाणे निकृष्ट दर्जाचे आणि असुरक्षित ठरले. तर आशा कन्फेक्शनरीच्या चॉकलेट भरलेल्या कुकीजमधील साखरेचे प्रमाण निर्धारित मानकांशी विसंगत आढळल्याने संबंधित कंपनीविरुद्धही खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
अस्वच्छता आणि पुनर्पॅकिंगच्या त्रुटींमुळे परवाने निलंबित
दरम्यान, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी उर्मी लाइफसायन्सेस एलएलपी आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर्स या दोन कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अस्वच्छ परिस्थिती आणि पुनर्पॅकिंगशी संबंधित त्रुटी या कारवाईमागील प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे. ई-कॉमर्स माध्यमातून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरही FSSAIने देखरेख वाढवली असून ऊर्जा पेये आणि मद्यपेय उत्पादक कंपन्यांनाही नियामक तपासणीच्या कक्षेत आणले आहे.
ग्राहकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर?
पाण्याची बाटली खरेदी करताना ग्राहक ब्रँडचे नाव, कंपनीची प्रतिष्ठा आणि शुद्धतेच्या दाव्यावर विश्वास ठेवतात. मात्र, नामांकित ब्रँडच्या पाण्याचा नमुना प्राथमिक तपासणीसह फेरतपासणीतही असुरक्षित ठरत असेल, तर सामान्य ग्राहकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. बाटलीबंद पाणी म्हणजे सुरक्षित पाणी, हा समज या प्रकरणामुळे हादरला आहे. अर्थात, खटला चालवण्यास मंजुरी मिळणे म्हणजे कंपनी न्यायालयात दोषी सिद्ध झाली, असा अर्थ होत नाही. अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे. मात्र, या कारवाईने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे... ज्या पाण्यावर शुद्धतेचा विश्वास ठेवून ग्राहक पैसे मोजतात, त्या पाण्याच्या गुणवत्तेची खात्री नेमकी कोण आणि कशी करणार?
________________________

Post a Comment