शेतकरी श्रीनिवास उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या फिर्यादीवरून पोफाळी पोलिसांत गुन्हा; तिघे ताब्यात, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
महागाव / सय्यद मुदस्सीर :- वेणी धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटरपंपाला जोडलेल्या केबल चोरी करून दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या तीन तरुणांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत सुमारे २४ हजार रुपये किमतीच्या ४८० फूट केबलचा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी पोफाळी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तक्रारीनुसार, डोंगरगाव येथील शेतकरी श्रीनिवास बाबाराव देशमुख यांच्या शेतासह परिसरातील इतर शेतकऱ्यांनी वेणी धरणावरून पिकांना पाणी देण्यासाठी मोटरपंप बसविले आहेत. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास काही इसम मोटरपंपाच्या केबल तोडून दुचाकीवरून घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली.
यानंतर गावातील नागरिकांनी डोंगरगाव बसनिवाऱ्याजवळ दुचाकीसह तीन तरुणांना पकडले. त्यांच्या ताब्यातील नायलॉनच्या पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये तोडलेल्या मोटरपंपाच्या केबल आढळल्या. पोलिसांना माहिती देऊन तिन्ही संशयितांसह मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणात दुर्गेश राम भंडारी (वय २१), पवन रमेश वाठोरे (वय १८) आणि तन्मय मांगीलाल जाधव (वय १८), तिघेही रा. तुकाराम बापू वॉर्ड, पुसद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या मोटरपंपाला जोडलेल्या विविध लांबीच्या केबल चोरीस गेल्याचे समोर आले असून, त्यामध्ये श्रीनिवास देशमुख यांची ६५ फूट तसेच अन्य सात शेतकऱ्यांची केबल मिळून एकूण ४८० फूट, अंदाजे २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोफाळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार निलेश शेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळी पोलीस करत आहे
“मोटरपंपाच्या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. सिंचनासाठी लावलेल्या केबल चोरीला गेल्याने पिकांना पाणी देणे अडचणीचे होते. शेतकरी आधीच संकटात असताना अशा चोरीच्या घटनांमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमाल व सिंचन साहित्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालावा.”
श्रीनिवास उर्फ बाळासाहेब देशमुख, शेतकरी, डोंगरगाव
________________________


Post a Comment