शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सिंदखेडराजा तहसील प्रशासनाची धडपड!

दिवाळीपूर्वी पाच हजारांची आर्थिक मदत मिळावी म्हणून सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालयात काम युद्धपातळीवर; उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व प्रभारी तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांच्याकडून कामाचा प्रत्यक्ष आढावा
लोकनेता न्युज नेटवर्क
 

सिंदखेडराजा / सुरेश हुसे :- दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी सिंदखेडराजा तहसील प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची आर्थिक मदत पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळावी, यासाठी तहसील कार्यालयात युद्धपातळीवर काम सुरू आहे. लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे, प्राप्त माहितीची पडताळणी करणे आणि अनुदान वितरणासाठी आवश्यक ऑनलाइन मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी शनिवार दिं ३१ आणि रविवार दिं १ नोव्हेंबर या शासकीय सुट्टीच्या दिवशीही तहसील कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.
    या संपूर्ण प्रक्रियेवर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि प्रभारी तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. कार्यालयात उपस्थित राहून ते कामाचा प्रत्यक्ष आढावा घेत असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासनातील कर्मचारीही सुट्टीच्या दिवशी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महसूल यंत्रणेची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
   शासनाच्या मदतीचे वितरण वेळेत व्हावे आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे पात्र शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी तहसील कार्यालयात विशेष नियोजन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, याद्यांची तपासणी करणे, त्रुटी दूर करणे आणि ऑनलाइन प्रणालीवर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करणे, अशी विविध कामे एकाच वेळी सुरू आहेत.
      उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व प्रभारी तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी संदीप बंगाळे, नैसर्गिक आपत्ती शाखेतील सौ. रोकडे, संगणक परिचालक गणेश देशमुख यांच्यासह अन्य संबंधित कर्मचारी या कामात सक्रिय सहभाग घेत आहेत. दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण व्हावे, या उद्देशाने प्रत्येक टप्प्यावर कामाला गती देण्यात येत आहे.
   अनुदान वितरणाची प्रक्रिया जलद आणि अचूक व्हावी, यासाठी केवळ तहसील कार्यालयातच नव्हे, तर गावपातळीवरही कामाला वेग देण्यात आला आहे. महसूल, कृषी आणि पंचायत विभागाचे अधिकारी व कर्मचारी परस्पर समन्वयाने पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करीत आहेत. गावोगावी लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे, त्यांची पडताळणी करणे आणि आवश्यक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
       विविध विभागांमध्ये समन्वय साधून याद्यांमधील त्रुटी दूर करणे आणि पात्र शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देणे, यावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील मदत वितरणाच्या कामाला अधिक गती मिळण्यास मदत होत आहे.
      दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सामायिक आहेत किंवा एकाच शेतीमध्ये अनेक सहहिस्सेदार आहेत, अशा खातेदारांनी अनुदानाची रक्कम नेमक्या कोणत्या सहहिस्सेदाराच्या बँक खात्यावर जमा करावी, याबाबतचे संमतीपत्र तहसील कार्यालयात लवकरात लवकर सादर करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांनी केले आहे.
      सामायिक खातेदारांच्या बाबतीत अनुदानाची रक्कम कोणाच्या खात्यावर जमा करायची, याबाबत स्पष्ट संमती मिळाल्यास पुढील प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी संमतीपत्र सादर करण्यास विलंब करू नये. वेळेत संमतीपत्र प्राप्त झाल्यास अनुदान वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.
     यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात मदतीची रक्कम पडल्यास त्यांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळू शकतो. ही बाब लक्षात घेऊन सिंदखेडराजा तहसील प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही काम सुरू ठेवत विशेष कार्यतत्परता दाखविली आहे.
      उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे मार्गदर्शन, प्रभारी तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांचे प्रत्यक्ष नियंत्रण आणि महसूल, कृषी व पंचायत विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समन्वित प्रयत्न यामुळे मदत वितरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
   शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करण्यासाठी प्रशासनाने घेतलेला पुढाकार निश्चितच दिलासादायक आहे. आता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत पाच हजार रुपयांची मदत वेळेत जमा होऊन बळीराजाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड व्हावी, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
________________________

0/Post a Comment/Comments