गोळीबार करून २२ तोळे सोने लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीवर मोक्का!



लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; उत्तरप्रदेशातून ३ सराईत आरोपींना अटक

लोकनेता न्युज नेटवर्क 

हवेली (प्रतिनिधी - संतोष कदम) :- शिरसवडी येथे गावठी पिस्टलमधून गोळीबार करून व्यावसायिकाला गंभीर जखमी करत २२ तोळे सोन्याच्या चैनी लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीवर लोणीकंद पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीतील तिन्ही आरोपींना उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

घटनाक्रम :

दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गावडेवाडी, शिरसवडी (ता. हवेली) येथे पंडीत गावडे यांच्या बंगल्यासमोर ही घटना घडली. फिर्यादी यांचे भाऊ वाडेबोल्हाई चौकातील ऑफिस बंद करून चारचाकीने घरी जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला.

ते गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ११ लाख रुपये किंमतीच्या, २२ तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन चैनी हिसकावून पळ काढला.

याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१५/२०२६, कलम १०९(१), ३११, ३(५) बीएनएस सह हत्यार कायदा कलम ३(२५), ३(२७) व म.पो.का. १३५, ३७(१) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

अटक आरोपी :

१) अविनाश कृष्णचंद्र त्रिपाठी (वय ४३)रा. बकोरी, ता. हवेली, जि. पुणे. मुळ गाव - कुटवली, बाराबाकी, उत्तरप्रदेश.
२) मोहम्मद शोएब वसीम खान सिद्दीकी (वय ३६)रा. बाराबाकी, उत्तरप्रदेश.
३) सुरेंद्र रामचंद्र पाल (वय ३२)रा. बाराबाकी, उत्तरप्रदेश.

या तिघांना दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली.

मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार :

मुख्य आरोपी अविनाश त्रिपाठी याच्यावर शिक्रापूर, कोरेगावपार्क, हडपसर, वजीरगंज, पी.जी.आय., बाराबाकी, चिनहट, कोतवालीनगर, लखनऊ येथे खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गँगस्टर ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतर दोघांवरही अपहरण, जबरी चोरी, चोरीसारखे गुन्हे आहेत.

आरोपी हिंसक मार्गाने दहशत निर्माण करून संघटितपणे गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ कलम ३(१)(i), ३(२), ३(४) - मोक्का लावण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त अबिनाश कुमार, सहा. आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर, सहा. निरीक्षक देविदास शेवाळे, गजानन कागणे, अंमलदार गणेश दळवी, शुभम सातव, विठ्ठल केदारी, ज्योती कुटे आणि लोणीकंद तपास पथकाने केली.
________________________

0/Post a Comment/Comments