हायवेवर पोलिसांचा सापळा, गांजा तस्करांचा गेम ओव्हर



१२८ किलो गांजा जप्त! ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, २ तस्कर जाळ्यात


लोकनेता न्यूज नेटवर्क

लोहारा / असलम खानापुरे :- जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. हैदराबाद - सोलापूर महामार्गावर पाठलाग करून आयशर वाहन अडवून पोलिसांनी तब्बल १२८ किलो ३८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अशी झाली कारवाई

दिनांक ०८/११/२०२६ रोजी रात्री १०:३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी सुदर्शन कासार व पथक कोंबिंग ऑपरेशन दरम्यान हैदराबाद - सोलापूर महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी उमरगा ते नळदुर्ग मार्गावर आयशर वाहन (MH 45 AX 9456) संशयास्पदरीत्या वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले.
   पोलिसांनी संशय आल्याने महामार्गावरील हॉटेल निरंजन, जळकोट जवळ सदर वाहनाचा पाठलाग करून थांबवले. वाहनाची तपासणी केली असता आत लपवून ठेवलेली गांजाची ६३ पाकिटे आढळून आली.

८० लाखांचा मुद्देमाल जप्त

तपासणीअंती एकूण १२८ किलो ३८० ग्रॅम गांजा, किंमत ६४ लाख १९ हजार रुपये, तसेच गांजा वाहतुकीसाठी वापरलेले आयशर वाहन, किंमत १६ लाख रुपये, असा एकूण ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघे तस्कर ताब्यात

या प्रकरणी आकाश साहेबराव दांगट (वय २९) व सागर महादेव जाधव (वय ३५), दोघेही रा. आनंद नगर, तालुका माळशिरस, जि. सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले असून, नळदुर्ग पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव हे करीत आहेत.

या पथकाने केली कामगिरी

सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार १४३१ गादेकर, १२७५ मुज्जू पठाण, पोलीस नाईक १६३१ अशोक ढगारे, चालक पोलीस हवालदार चौरे, गुरव यांनी केली आहे.
   या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले असून, नागरिकांकडून स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.
________________________

0/Post a Comment/Comments