बळीराजा गौरव सोहळ्यात प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन,
स्त्रियांनी कर्मकांडापासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा,
उमरखेड / गोपीचंद दोडके :- "महासम्राट बळीराजा हे अत्यंत विद्वान, दानशूर, आणि जनकल्याणकारी राजा होते. शेतकरी, कारागीर आणि आदिवासींचे ते खऱ्या अर्थाने सखे व आदर्श होते. बळीराजांमध्ये सद्गुणांचा आणि विविध गुणांचा संगम होता म्हणून आजही आपल्या माता-भगिनी ‘इडा-पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ अशी प्रार्थना करतात. बळीराजा हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते," असे प्रतिपादन केतन देशमुख यांनी केले.
बळीराजा गौरव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित ‘बळीराजा गौरव सोहळ्या’त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी स्त्रियांनी कर्मकांडापासून दूर राहून विज्ञाननिष्ठ व्हावे, असे आवाहनही केले.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, "आज जर बळीराजाचे राज्य असते, तर शेतकऱ्यांना शासनाच्या पाच हजार रुपयांच्या मदतीची गरजच पडली नसती. त्यामुळे आजच्या राज्यकर्त्यांनी बळीराजाचा आदर्श घेऊन शेतकरी व कष्टकऱ्यांच्या हितासाठी ठोस कार्य करायला हवे." शहरात सकाळी सात वाजता काशिनाथ मानकरी यांच्या शेतकऱ्यांच्या बैलगाडीतून बळीराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधीतज्ज्ञ ॲड. संतोष जैन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशराव कदम, डी. डी. अंबुरे, प्रकाश शिंदे, चक्रधर देवसरकर, बालाजी चं. वानखेडे, उत्तम बर्वेड आणि मझहर टेलर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद मोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बालाजी वानखेडे यांनी मानले.
________________________

Post a Comment