फटाक्याच्या ठिणगीतून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; चारा, स्प्रिंकलर संच, पीव्हीसी पाइपसह शेती साहित्य जळून खाक;महसूल प्रशासनाकडून पंचनामा; नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदतीची मागणी
सिंदखेडराजा / प्रतिनिधी :- दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांमुळे घडणाऱ्या दुर्घटनांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथे ९ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता फटाक्यामुळे शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीत नरसिंग सिताराम सोसे यांचे गोठ्यातील साहित्य आणि शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंग सोसे यांचा गावठाणालगत जनावरांचा गोठा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिसरात फटाके फोडले जात असताना गोठ्याला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गोठ्यात साठवून ठेवलेला चारा आणि शेतीसाठी लागणारे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत एक स्प्रिंकलर संच, सोयाबीन भुशाच्या दोन टाल्या, शाळूच्या सुमारे ३०० ते ४०० पेंढ्या, दहा सुप्रीम पीव्हीसी पाइप, तीन जुने दरवाजे, मळणीसाठी वापरण्यात येणारे जुन्या जोडणीचे खांब, पत्रे तसेच इतर साहित्य जळून नुकसान झाले. वर्षभराच्या शेती कामासाठी उपयोगी पडणारे साहित्य आगीत नष्ट झाल्याने सोसे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली. ग्राम महसूल अधिकारी बी. जी. साळवे यांनी नुकसानीचा पंचनामा करून प्राथमिक अहवाल सादर केला. यावेळी महसूल सेवक ज्ञानेश्वर ढाकणे उपस्थित होते.
आधीच शेतीचा वाढता खर्च, उत्पादनातील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला या आगीमुळे आणखी संकटाला सामोरे जावे लागत आहे. गोठ्यातील चारा आणि सिंचन साहित्य जळाल्याने शेतीच्या पुढील कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने पंचनाम्याच्या आधारे नुकसानभरपाईसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि शासनाच्या नियमानुसार नरसिंग सोसे यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
दिवाळीच्या काळात फटाके फोडताना गोठे, चारा साठवणूक आणि शेती साहित्य असलेल्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
________________________


Post a Comment