कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून २६ वर्षीय वैभव भुसारी यांची शेतात गळफास घेऊन आत्महत्या!

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले; पत्नी, आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर

लोकनेता न्युज नेटवर्क 

सिंदखेडराजा / प्रतिनिधी :- कर्जबाजारीपणा च्या विवंचनेतून हिवरखेड पूर्णा येथील अवघ्या २६ वर्षांच्या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी घडली. वैभव विठोबा भुसारी असे मृत तरुणाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे हिवरखेड पूर्णा परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, वैभव यांच्या पश्चात अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा, पत्नी, आई-वडील आणि वृद्ध आजी-आजोबा असा परिवार आहे.

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या आयुष्यात वडिलांची माया हरपली!


वैभव यांचा विवाह रूपाली यांच्याशी झाला होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या संसारात देवानंद या मुलाच्या रूपाने आनंदाचे आगमन झाले होते. अवघ्या दोन महिन्यांचा हा चिमुकला अजून वडिलांना ओळखण्याच्या वयातही आलेला नाही. मात्र, नियतीच्या क्रूर आघाताने त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हरपले. ज्या वडिलांच्या हाताचा आधार घेऊन त्याने मोठे व्हायचे होते, त्या वडिलांची माया अनुभवण्यापूर्वीच त्यांच्यापासून तो कायमचा दुरावला आहे. पत्नी रूपाली यांच्या संसारावरही या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दहा एकर शेती असतानाही कर्जाचा विळखा?


वैभव यांच्या 
कुटुंबाची राहेरी खुर्द येथील गट क्रमांक १४२ आणि किनगाव राजा येथील गट क्रमांक २५५ मध्ये मिळून सुमारे दहा एकर शेती असल्याची माहिती आहे. मात्र, कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. शेती असूनही आर्थिक अडचणी आणि कर्जाचा ताण तरुण शेतकऱ्यांच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम करू शकतो, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे.

आई-वडील, आजी-आजोबांवरही दुःखाचा डोंगर


वैभव यांच्या पश्चात वडील विठोबा शेषराव भुसारी, आई अनिता विठोबा भुसारी, पत्नी रूपाली वैभव भुसारी, दोन महिन्यांचा मुलगा देवानंद, बहीण आचल बालाजी वीर, आजोबा शेषराव दाजीबा भुसारी आणि आजी लक्ष्मीबाई शेषराव भुसारी असा परिवार आहे. कुटुंबातील तरुण आधार हरपल्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कर्जबाजारीपणाच्या समसेने एका तरुणाचे आयुष्य संपले, एका पत्नीचा संसार उद्ध्वस्त झाला आणि अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या आयुष्यात वडिलांच्या मायेची कायमची पोकळी निर्माण झाली. या घटनेने संपूर्ण परिसरातील नागरिकांचे मन हेलावून गेले आहे.
________________________

0/Post a Comment/Comments