शिरूर अनंतपाळ / रहीम पटेल :- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अकुलगाव येथे फिरती एटीएम मोबाईल व्हॅन दाखल झाली. या सुविधेला गावातील शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम निधी जमा करण्यात आला आहे. ही रक्कम काढण्यासाठी बँकेच्या शाखांमध्ये शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी होत होती. मात्र, बँकेची फिरती एटीएम व्हॅन थेट गावात दाखल झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पैसे काढणे, पैसे भरणे तसेच खात्यातील शिल्लक तपासणे अशा विविध बँकिंग सुविधा गावातच उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे बँकेत जाण्यासाठी लागणारा वेळ, प्रवासाचा खर्च आणि होणारा त्रास वाचत आहे.
एटीएम व्हॅन दाखल होताच सकाळपासूनच नागरिकांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. ‘आता बँक आपल्या गावातच आली असून, पैशांच्या व्यवहारासाठी साकोळ किंवा शिरूर अनंतपाळ येथे जाण्याची गरज उरली नाही,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सुविधा घराजवळ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून, फिरती एटीएम व्हॅनची सेवा नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी बँक प्रशासनाकडे केली आहे.
________________________

Post a Comment