दारूमुक्त सेनगावसाठी आ. संतोष बांगर मैदानात,दोन महिन्यांत शासन दरबारी पाठपुरावा

लाडक्या बहिणींना किट वाटप सोहळ्यात महिलेच्या आर्त हाकेनंतर आमदारांनी घेतली ठाम भूमिका

लोकनेता न्यूज नेटवर्क
 

सेनगाव /महादेव हारण :- सेनगाव शहरात शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणींना 'आनंदाचा शिधा'अर्थात किराणा मालाचे किट वाटप करण्याचा भव्य सोहळा आणि युवा नेते प्रितेश सारडा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते दि.१५ नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात पार पडले.या आनंदाचा शिधा किट वाटप सोहळ्यादरम्यान एका लाडक्या बहिणीने "आनंदाचा शिधा नको,तर सेनगाव शहरातील संपूर्ण दारुबंदी करा"अशी आर्त हाक मारली. यावर आ.संतोष बांगर यांनीही तात्काळ ठाम भूमिका घेत,"येत्या दोन महिन्यांत दारूबंदीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून मतदान घेण्यात येईल;तुम्ही 'आडव्या बाटलीला' मतदान करा,दारूची दुकाने बंद केली नाहीत तर संतोष बांगर नाव लावणार नाही,"असा थेट शब्द देत महिलांची मने जिंकली.

    सेनगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.सेनगाव शहरासह बरडा आणि वैतागवाडी येथील सुमारे ३ हजार लाडक्या बहिणींनी या किराणा मालाच्या किटचा लाभ घेतल्याची माहिती शिवसेनेचे युवा नेते प्रितेश सारडा यांनी दिली.हिंगोली शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे कार्यसम्राट आ.संतोष बांगर यांच्या हस्ते महिलांना गोडतेल,साखर,रवा,मैदा, तिखट यांसह किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.आनंदाचा शिधा किट वाटप सुरु असतानाच एक महिला व्यासपीठासमोर आली. दारूच्या व्यसनाने आपला बाप आणि मुलगा गमावल्याची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा तिने मांडली."आम्हाला आनंदाचा शिधा नको,तर सेनगाव शहरातील संपूर्ण दारूबंदी करा दारूमुळे आमचे संसार उद्ध्वस्त होत आहेत,"कशी आर्त हाक तिने मारली. हे बोलताना तिला अश्रू अनावर झाले आणि उपस्थित हजारो महिलांनी तिच्या मागणीला टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला.त्या महिलेची आर्त हाक ऐकून आ.संतोष बांगर हेदेखील भावुक झाले आणि त्यांनी तात्काळ दारूबंदीचा निर्धार जाहीर केला.उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की,"ती बिचारी ताई खूप लढली आहे.तिचा बाप गेला,मुलगाही गेला.ज्या घरात दारू आहे,तिथे ती माऊली रोज तीळतीळ मरते.बाबा, पलटायचं नाही माय... येत्या दोन महिन्यांत दारूबंदीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून मतदान घेण्यात येईल. तुम्ही 'आडव्या बाटलीला' मतदान करून दारूबंदीसाठी सहकार्य करा.इमानेइतबारे सेनगाव शहरातील तुमची सगळी दारूची दुकाने जर नाही बंद करून दिली,तर संतोष बांगर म्हणून नाव लावणार नाही,ध्यानात ठेवा!"
आ.बांगर यांच्या या आवाहनाला उपस्थित हजारो लाडक्या बहिणींनी "हो... हो..." म्हणत टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आमदारांचे आभार मानले.किराणा मालाचे किट वाटप कार्यक्रम पार पडल्यानंतर,शिवसेनेचे युवानेते प्रितेश सारडा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आ.संतोषदादा बांगर यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.सर्वसामान्य नागरिकांच्या आणि लाडक्या बहिणींच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय हक्काचे व्यासपीठ ठरेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या दोन्ही कार्यक्रमांना माजी जि.प.सदस्य द्वारकादासजी सारडा,केदारमल सारडा,युवा नेते प्रितेश सारडा,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी,माजी सभापती कांतराव हराळ,प्रकाशराव देशमुख,जितू देशमुख,माजी सभापती गजानन पोहकर,युवासेना तालुकाप्रमुख अशोक इंगळे,माजी उपनगराध्यक्ष निखिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
________________________

0/Post a Comment/Comments