भाजपात 'शिवाजी'वर 'भरोसा' नाय, स्वीकृतसाठी स्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध हाय !
स्वकीयांनीच छाटले पंख; श्रेष्ठींच्या आदेशालाही केराची टोपली, भरोसेंच्या स्वीकृतीलाच ठरवले 'अस्वीकृत' !
लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी / दत्तात्रय कराळे :- परभणीच्या राजकारणात मागील काही कालावधीपासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजीने अक्षरशः कळस गाठला आहे. "पालकमंत्र्यांचा वचक पडला ढिल्ला, अन् परभणी भाजपात गजब झाला !" अशीच काहीशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून परभणी भाजपातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, स्वपक्षातीलच शिवाजी भरोसे यांच्या नावाला दहा नगरसेवकांनी असलेला कडवा विरोध कायम ठेवत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात पक्षश्रेष्ठींनी दिलेले संकेत आणि विनंतीपूर्वक आदेशही परभणीतील स्थानिक नगरसेवकांनी धुडकावून लावले आहेत. महानगरप्रमुखपदी कार्यरत असलेले शिवाजी भरोसे हे पालकमंत्री आणि काही वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील मानले जातात. परंतु प्रमुख असलेल्या शिवाजी भरोसे यांनी बनवलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये कोणाच्याही परवानगीशिवाय आपले स्वतःचे नाव घुसविल्याने ही तीव्र नाराजी पुढे आल्याचे समजते. त्याशिवाय मनपातील गटनेतेपदी आपल्या मर्जीतील नगरसेविकेची नियुक्ती करुन आपल्या नावाला संमती मिळवली होती. त्याचाच परिपाक म्हणून संतप्त झालेल्या स्वपक्षातील दहा नगरसेवकांनी आपला विरोध असल्याचे कायम दाखवून मनमानी करणाऱ्या भरोसेंचे पंखच छाटणे योग्य राहील यावर पूर्णपणे एकवटले. प्रत्येकवेळी केलेली मनमानी त्यातच मंत्री असोत किंवा श्रेष्ठी यांना अंधारात ठेवून चालवलेली मनमानी नाराज सर्वांना कुरघोडी ठरल्याचे जाणवले गेले. सर्वसंमतीने आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार शिस्तीचे पालन केले असते तर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले असते परंतु नाकापेक्षा होती जड नको म्हणून त्यांच्या ऐवजी, स्वकीयांनीच त्यांच्या 'स्वीकृती'ला थेट 'अस्वीकृती' दाखवत राजकीय वर्तुळात स्फोटक परिस्थिती निर्माण करुन मोठी खळबळ उडवून दिली आहे. "परभणी भाजपात शिवाजीवर भरोसा नाय, स्वीकृतसाठी स्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध हाय," जणू असाच काहीसा सूर सध्या शहराच्या राजकीय कट्ट्यांवर उमटत आहे.
पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह ?
परभणी भाजपात शिस्त आणि नेतृत्वाचा मोठा दबदबा असल्याचे बोलले जात होते. मात्र, मागील काही निवडणूका पासून पक्षांतर्गत उफाळून आलेला कलह कमालीचा विकोपाला गेला आहे. त्याचाच परिपाक म्हणून कोणाचा पायपोस कोणा मध्ये नाही अशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 'कोणच कोणाचे ऐकेना अन् तिथे कोणाचे काही चालेना' असा सावळा गोंधळ उडाला आहे. पालकमंत्री व वरिष्ठांना डावलून आपल्या मनमानीपणाचं घोडं पुढे दामटवणाऱ्या भरोसे यांना वेळीच वेसण घातली जावी म्हणून जणू काही सर्वच एकवटले असावेत. त्याचाच पहिला भाग म्हणून पक्षातील तब्बल दहा नगरसेवकांनी एकत्र येत शिवाजी यांच्यावर भरोसा नाही, जणू याच इराद्याने त्यांच्या विरोधात दंड थोपटले असावेत अशी चर्चा जोर धरते आहे. किंबहुना त्यासाठीच पालकमंत्र्यांचा पक्षावरील वचक ढिल्ला पडला आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. या व अशा अनेक घटनांमुळे पक्षात माजलेला काहूर परभणी भाजपालाच नव्हे तर श्रेष्ठींना ही डोईजड होऊन ती कायमची डोकेदुखी होत असल्याची तीव्र भावना या नाराज नगरसेवकांमध्ये आणि वरिष्ठांच्यात आहे. जर श्रेष्ठींच्या शब्दालाही किंमत उरली नसेल, तर आगामी काळात परभणी भाजपातील गटबाजी कशी थांबणार, असा प्रश्न आता सामान्य कार्यकर्त्यांनाही पडला आहे.
विरोधी पक्ष बळ देणार का? लागल्या सर्वांच्या नजरा!
एकीकडे स्वकीयांनीच शिवाजी भरोसे यांचे राजकीय पंख छाटले असताना, आता या नाट्यमय घडामोडीत विरोधी पक्ष भरोसे यांना बळ देऊन स्वागत करतील, का सहकारी पक्षात ते झेप घेऊन भाजपाला धक्का देतील याबद्दल आश्चर्यकारक अशा चर्चा रंगल्या जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परभणी भाजपातील या संभाव्य फुटीचा फायदा घेत विरोधक आपल्या पक्षात जुळवाजुळव करून या राजकीय खेळात नवीन ट्विस्ट आणणार का, की पडद्यामागून काही वेगळ्याच राजकीय तडजोडी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या तरी परभणी भाजपात घरचा आहेर मिळाल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळणार आहे. श्रेष्ठींची नाराजी ओढवून घेत एका बाजूला भरोसेंनी उडवून दिलेली ही 'राजकीय धमाल' आता नेमक्या कोणत्या वळणावर जाऊन थांबते, याकडे संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे एवढे मात्र निश्चित..!
________________________

Post a Comment