चौकीपासून ५०० मीटरवरील अपघातही कळत नाही
एका आठवड्यात दोन भीषण दुचाकी अपघात; आडगाव फाट्यावरील अपघातात २३ वर्षीय युवकाचा मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी झुंजतोय; महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेवर गंभीर प्रश्नचिन्ह
लोकनेता न्यूजनेटवर्क
जिंतूर | रत्नदीप शेजावळे :- महामार्गावर अपघात घडू नयेत, वाहतुकीवर नियंत्रण राहावे आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी महामार्ग पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. मात्र, जिंतूर परिसरातील औंढा महामार्गावरील अपघातांच्या घटनांनंतर या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मागील आठवड्यात महामार्ग पोलीस चौकीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर प्रताप टी पॉईंट येथे पुंगळा येथील कृष्णा पंढरी जगताप या १९ वर्षीय युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर १८ नोव्हेंबरच्या रात्री आडगाव फाटा परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, या दोन्ही अपघातांची माहिती महामार्ग पोलिसांना वेळेत मिळाली का, मिळाली असेल तर त्यांनी काय कार्यवाही केली, आणि माहितीच मिळाली नसेल तर चौकीच्या आसपास घडणाऱ्या घटनांवर त्यांचे लक्ष तरी आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
आडगाव फाटा परिसरातील अपघातात वडधुती येथील अरुण गणेश राठोड (वय २३) आणि करवली येथील तेजस माधव घाटुळ (वय २०) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अरुण राठोड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज पहाटे संपली. एका कुटुंबातील तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाला, तर दुसरा युवक गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
या अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना मदत करण्यासाठी धाव घेतली. नागेश आकात यांच्यासह ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, अपघातानंतर महामार्ग पोलिसांची भूमिका काय होती, घटनास्थळी किंवा रुग्णालयात त्यांचे अधिकारी-कर्मचारी पोहोचले होते का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. स्थानिक पातळीवर महामार्ग पोलीस घटनास्थळी किंवा रुग्णालयात फिरकले नसल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक असले, तरी त्यातून निर्माण झालेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत.
चौकीपासून ५०० मीटरवर अपघात; मग पोलिसांचे लक्ष कुठे?
मागील आठवड्यात प्रताप टी पॉईंट येथे महामार्ग पोलीस चौकीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर दुचाकी अपघात घडल्याची माहिती आहे. त्यानंतर आडगाव फाटा परिसरात आणखी एक गंभीर अपघात होतो आणि त्यात एका युवकाचा मृत्यू होतो. दोन अपघात, दोन वेगवेगळ्या घटना आणि दोन्ही वेळेस महामार्ग पोलिसांच्या तत्परतेबाबत प्रश्न उपस्थित होणे, ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. महामार्गावर अपघात झाल्यानंतर माहिती मिळविणे, घटनास्थळी मदत पोहोचविणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि जखमींना उपचार मिळवून देणे ही जबाबदारी संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात येते. मग या घटनांमध्ये नेमकी कोणती कार्यवाही झाली, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
अपघात रोखण्यासाठी यंत्रणा की केवळ चौकीपुरती उपस्थिती?
महामार्ग पोलीस चौकी उभारण्यामागचा उद्देश केवळ कार्यालयीन उपस्थिती दाखविणे नसून महामार्गावरील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणे हा आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनीच धावपळ करायची, जखमींना रुग्णालयात पोहोचवायचे आणि पोलिसांची उपस्थिती शोधत राहायचे असे चित्र निर्माण होत असेल, तर महामार्ग पोलिसांच्या कामकाजाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेण्याची वेळ आली आहे. रात्रीच्या वेळी गस्त कोणत्या मार्गावर असते? अपघातांची माहिती मिळविण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? चौकीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ड्युटी नेमकी कुठे असते? अपघातानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी निश्चित केलेली कार्यपद्धती पाळली जाते का? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. दरम्यान, जिंतूर पोलिसांचे कर्मचारी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आडगाव फाटा अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघाताची जिंतूर पोलीस ठाण्यात नोंद झालेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दोन दिवसांत अपघातग्रस्त दुचाकीचे पार्ट चोरीला
अपघात झाल्यानंतर पंचनामा करून वाहन ताब्यात घेणे हे महामार्ग पोलिसांचे कर्तव्य आहे. परंतु पुंगळा येथील युवकाच्या अपघातग्रस्त दुचाकीचे सर्व भाग दोन दिवसांत काढून आज्ञातांनी घेऊन गेल्याचे समजते आहे यात गाडीचे दोन्ही चाक बॅटरी आणि हेडलाईट अज्ञातांनी घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित महामार्ग पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दोन्ही अपघातांची माहिती घेऊन चौकशी करावी, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची घटनास्थळी उपस्थिती, गस्तीचे रेकॉर्ड आणि अपघातानंतर केलेल्या कार्यवाहीची तपासणी करावी. अपघाताची माहिती मिळूनही दुर्लक्ष झाले असेल तर जबाबदारी निश्चित करावी. कारण महामार्गावर एखाद्याचा जीव गेल्यानंतर केवळ पंचनामा आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणेची जबाबदारी संपत नाही. नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणे आणि भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये तातडीची मदत मिळेल, याची खात्री करणेही प्रशासनाचे कर्तव्य आहे. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांत महामार्ग पोलीस चौकीच्या कार्य पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
________________________

Post a Comment