प्रवाशांचा जीव टांगणीला, जाग कधी येणार कुंभकर्णी प्रशासनाला !

मराठवाड्यात दरोडे आणि आरक्षित डब्यांत घुसखोरीचा सुळसुळाट


अखिल भारतीय रेल्वे प्रवासी महासंघाचा तीव्र संताप

लोकनेता न्युज नेटवर्क 


परभणी | प्रतिनिधी :- चढ्या दराने तिकीट विकायचे, पण प्रवाशी सुरक्षेच्या नावाने मात्र बोंब ठोकायची," असाच काहीसा संतापजनक कारभार सध्या भारतीय रेल्वेचा सुरू आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील दरोड्याची शाई वाळत नाही, तोच मराठवाड्यातील रेल्वे मार्गांवर वारंवार होणाऱ्या लुटमारीच्या आणि दरोड्याच्या घटनांनी प्रवाशांच्या काळजाचा ठोका अधिकच वाढीस लागला आहे. एका बाजूला दरोडेखोरांची दहशत तर‌ दुसऱ्या बाजूला तिकीट तपासनीसांच्या (TTE) आशीर्वादाने आरक्षित डब्यांत होणारी अनधिकृत घुसखोरी, या दुहेरी कात्रीत प्रवासी सापडला आहे. अखिल भारतीय रेल्वे प्रवासी महासंघाने या भोंगळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जळजळीत ताशेरे ओढले आहेत.

आर्थिक लुटीसोबतच प्रवाशांच्या जीवाशी खेळ

मराठवाड्यातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सुरु आहे. चोरी, लुटमार आणि दरोडे, प्रसंगी धारदार शस्त्र आणि घातकी शस्त्रांचे जीवघेणे हल्ले असे प्रकार घडणे हे नित्याचेच झाले आहे. या घटनांमुळे प्रवाशांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, पण त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे प्रवाशांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.      

परिणामी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवासांत आपला जीव मुठीत घेऊन बसावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

आरक्षित डब्यांचा बाजार आणि प्रशासनाची हातमिळवणी :

       एकीकडे सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना, दुसरीकडे एसी किंवा स्लीपर आरक्षित डब्यांची अवस्था जनरल डब्यांपेक्षाही वाईट झाली आहे. चालू जनरल तिकीटं काढून डब्यांत घुसखोरी करू दिली जात असल्याचा गंभीर आरोप महासंघाने केला आहे. महिनोन्‌महिने आधी तिकीट बुक करून जादा पैसे मोजणाऱ्या प्रामाणिक प्रवाशांच्या हक्कांवर ही एक प्रकारची गदाच आहे.

नैतिक मूल्यांचा विसर की जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?

         प्रवासी संघटनांकडून या संदर्भात वारंवार निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही रेल्वे ढिम्म प्रशासन मात्र जागण्यास तयार नाही. प्रवाशांच्या मूलभूत गरजा आणि सुरक्षिततेकडे प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. रेल्वे प्रशासनाला आपल्या नैतिक मूल्यांचा आणि जबाबदारीचा सोयीस्कर विसर पडला आहे का, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे.

रेल्वे मंत्र्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज

         लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्यांमधील अपुरी आणि निष्क्रिय सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारण्याची गरज आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि खुद्द रेल्वे मंत्र्यांनी या भयाण प्रकारांची गंभीर दखल घ्यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. अन्यथा प्रवाशांच्या या संतापाचा उद्रेक रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

________________________

0/Post a Comment/Comments