कंधार न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी बेमुदत संपावर; न्यायालयीन कामकाज विस्कळीत!

प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार; मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार

लोकनेता न्यूज नेटवर्क

कंधार | धोंडीबा मुंडे :- राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला मंगळवार, दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कंधार न्यायालयात सुरुवात झाली. या संपात कंधार न्यायालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून, पहिल्याच दिवशी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    समान काम, समान वेतन, सुधारित वेतनश्रेणी लागू करणे यासह विविध आर्थिक व सेवाविषयक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या मागण्यांसंदर्भात कर्मचारी संघटनांनी यापूर्वी अनेकदा शासनाकडे निवेदने सादर करून पाठपुरावा केला होता. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.

    संपाच्या पहिल्याच दिवशी कंधार न्यायालय परिसरात सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र आले. यावेळी त्यांनी प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत संप मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.न्यायालयीन कामकाजावर परिणाम

           कंधार न्यायालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने न्यायालयाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. प्रकरणांच्या नोंदी, न्यायालयीन कागदपत्रांची हाताळणी, सुनावणीसंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया, आदेशांची अंमलबजावणी तसेच इतर कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले आहे. त्यामुळे न्यायालयीन कामासाठी येणारे पक्षकार, वकील आणि नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या न्यायालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


 या दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत कंधार न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या संपात कंधार न्यायालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

________________________

0/Post a Comment/Comments